पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) ताफ्यात सीएनजी, इलेक्ट्रिक बस दाखल होत असून मार्गिका विस्तार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) जागेची मागणी केली आहे. त्यानुसार शहरातील धायरी, हवेली, हिंजवडी, तळेगाव, रांजणगाव येथील औद्योगिक भूखंड आणि विविध अनारक्षित ३० एकर मोकळे भूखंड द्यावे, अशा मागणीचे संबंधित विभागांना पत्र पाठवले आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गतीमान आणि प्रवासी पूरक करण्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनात मोठे बदल करण्यात येत आहेत. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने पीएमपीच्या ताफ्यात सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस दाखल होत असून नवीन मार्गिका आणि सेवेचा विस्तार करण्यात येत आहे. त्यानुसार सध्या पीएमपीच्या सुमारे ३८१ मार्गिकांंपेक्षा जादा मार्गांचा विस्तार होत असून सध्या ताफ्यात दोन हजार २०० बस संचलनात आहेत. यापैकी एक हजार पीएमपी सीएनजी इंधनावर आधारित असून, ३०० पीएमपी इलेक्ट्रिक आहेत, तर तर नव्या वर्षात आणखी दोन हजार ४०० नवीन पीएमपी ताफ्यात दाखल होणार आहे. त्यामुळे वाहतळळ व्यवस्था, चार्जिंग सुविधा, देखभाल दुरुस्ती, नवीन आगार, थांबे यांच्यासाठी जागा आवश्यक असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिली.
देवरे म्हणाले, ‘पीएमपी विस्ताराच्या दृष्टीने नियोजन आवश्यक आहेत. सध्या ताफ्यात नव्याने पीएमपी दाखल होत असून जागांची कमरतता भासते आहे. वेळीच नियोजन केले नाही, तर बससाठी इंधन भरणे, इलेक्ट्रिक बस चार्जिंग आणि देखभाल-दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध असतील. अन्यथा, हजारो नव्या बस व्यवस्थापित करणे कठीण होईल, शिवाय प्रवाशांना विलंब आणि सेवा खंडित होऊ, नये म्हणून पूर्वनियोजनानुसार पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, पीएमआरडीए आणि एमआयडीसीकडे आगाऊ जागांची मागणी करण्यात आली आहे.’
शहर विस्तारीकरण झपाट्याने होत असून पीएमपी विस्तार अत्यंत महत्वाचा आहे. नागरिकांकडून पीएमपी सुरू करण्याची मागणी वारंवार होत आहे. त्यानुसार या जागांची पाहणी, चाचणी, तपासणी करून नियोजन करण्यात येत आहे. या जागा मिळाल्या, तर नक्कीच पीएमपीचा विस्तार करून संचलन सुरळीत राहील आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा देता येईल, असे देवरे यांनी नमूद केले.
पीएमपीचा आढावा
एकूण डेपो : १५
नवीन आगारांची आवश्यकता : १६
चार्जिंग केंद्र : ६
मार्गिका : सुमारे ५७९
थांबे : ८,१३८
एकूण बस : २,२००
हस्तांतरीत जागा : (पीएमआरडीए हद्दीत भोसरी, मोशी, रावेत)