पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘फिरते पास केंद्र’ हा उपक्रम हाती घेतला आहे. मासिक पास सुविधा आता ठिकठिकाणच्या परिसरात प्राप्त होणार असल्याने आता विद्यार्थ्यांना ‘पीएमपी’ कार्यालय किंवा आगारांच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. त्यानुसार फिरत्या सुविधा केंद्रासाठी विशेष दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी (५ ऑगस्ट) ‘पीएमपी’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमामुळे आता पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या ग्रामीण भागांतील प्रवाशांना त्यांच्या परिसरातच मासिक पास मिळणार आहेत. “फिरते पास केंद्र” दर सोमवारी ते शनिवारी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० या वेळेत पुढील ठिकाणी कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती पीएमपी महामंडळाकडून देण्यात आली.

पास शिवाय या सुविधाही

या फिरत्या केंद्रातून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना मासिक पास काढण्याची सुविधा मिळणार असून, महापालिकेच्या अनुदानित योजनांची माहितीही याठिकाणी दिली जाणार आहे. याशिवाय रोख रक्कम, क्यूआर कोड आणि पी.ओ.एस. मशीनद्वारे पास शुल्क स्वीकारले जाणार आहे. प्रवाशांना पीएमपीच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे.

असे असणार फिरते पास केंद्र

वार – स्थळ

सोमवार – एसएनडीटी महाविद्यालय (मेट्रो स्टेशन)

मंगळवार – कोंढवा गेट (एनडीए सर्कल)

बुधवार – खडी मशिन चौक (केजे -जेके महाविद्यालय)

गुरुवार – राधा चौक (बाणेर–बालेवाडी)

शुक्रवार – हिंजवडी गाव (शिवाजी चौक)

शनिवार – आकुर्डी रेल्वे स्टेशन

फिरते पास केंद्र हा उपक्रम नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तसेच ‘पीएमपी’च्या उत्पन्नवाढीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करून इतर भागातही केंद्रे सुरू करण्याचा मानस आहे. – पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक, पीएमपी