पिंपरी : आशिया कप २०२५ मधील बांगलादेश–श्रीलंका सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोन भावांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने छापा टाकून कारवाई केली. पिंपरी कॅम्पमधील एका बारमध्ये हा बेकायदेशीर बेटिंगचा अड्डा सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलिंग दरम्यान मालमत्ता विरोधी पथकातील सहायक निरीक्षक दत्तात्रय गुळींग, हवालदार नितीन लोखंडे, गणेश हिंगे, गणेश कोकणे यांना पिंपरीतील एका बारमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्या. पोलिसांनी चौकशी केली असता दोघे लॅपटॉप-मोबाइलच्या साहाय्याने क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग खेळताना आढळून आले. दोघांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. मालमत्ता विरोधी पथक तपास करत आहेत.

नेहरुनगरमध्ये दुकानदाराला मारहाण करून लुटले

चहाच्या दुकानातून तीन अनोळखी इसमांनी लुटमार करत दुकान चालकाला मारहाण केल्याची घटना रविवारी पिंपरीतील नेहरूनगर येथे घडली.या प्रकरणी आशिषकुमार शत्रुघ्न प्रसाद (२८, नेहरुनगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिषेक रामस्वामी अलंकुटे (२०, मोशी), ईश्वर तुकाराम गायकवाड (२०, पिंपरी) आणि अभिजीत बाळासाहेब कदम (२१, चोविसावाडी, च-होली) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषकुमार हे चहाचे दुकान उघडत असताना दोन दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी काडीपेटीची मागणी केली. त्यानंतर त्यांनीआशिषकुमार शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. दगड मारून जखमी केले. एका आरोपीने दुकानाच्या काउंटरमधून एक हजार २०० रुपये आणि सिगारेटची सात पाकिटे, एकूण दोन ६०० रुपयांचा माल जबरदस्तीने घेतला. त्यानंतर, त्यांनी रस्त्यावर ये-जा करणाऱ्या लोकांना “आम्ही येथील भाई आहोत, कोणी आमच्या नादाला लागल्यास त्याची अशी अवस्था करू” अशी धमकी देत दहशत निर्माण केली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

मोटार घेऊन पसार

विश्वास संपादन करून एका व्यक्तीने २० हजार रुपये प्रति महिना भाड्याने मोटार घेतली आणि ती परत न देता पसार झाल्याचा प्रकार भोसरीत घडला. याबाबत ४० वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार एका विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २० हजार रुपये प्रति महिना भाडे देण्याच्या बहाण्याने फिर्यादीचा विश्वास जिंकला. मोटार ताब्यात घेतली. त्यानंतर तो मोटार घेऊन पसार झाला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

निगडीत कौटुंबिक वादातून दिराला मारहाण

कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून दोन महिलांनी दिराला मारहाण केल्याची घटना निगडीत घडली. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या भावाची पत्नी आरोपी महिला यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. त्या कारणावरून भावाची पत्नी आणि तिच्या मोठ्या बहिणीने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. घराच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या भिंतीवर ढकलून दिले. त्यामुळे फिर्यादीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

चिखली येथील स्मशानभूमीजवळील रोडवर एका १९ वर्षीय तरुणाला कोयता बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी (२१ सप्टेंबर) करण्यात आली.

या प्रकरणी आदित्य शिवाजी जाधव (१९, चिखली, पुणे मूळ परळी, जि. बीड) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई अमोल वेताळ यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य याने आपल्या जवळ ५०० रुपयांचा लोखंडी कोयता कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे बाळगला. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून कोयता जप्त केला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

म्हाळुंगेत ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात २० सप्टेंबर रोजी पहाटे म्हाळुंगेेतील इंड्यूरन्स चौक येथे घडला.

तुफान दिलीप मोंडल (२५, मूळ पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तुफान यांच्या मित्राने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र तुफान हे दुचाकीवरून कंपनीत कामाला जात होते. इंद्रायणी चौकातून एचपी चौकाकडे वळत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादीला किरकोळ दुखापत झाली, तर त्यांचा मित्र तुफान यांचा मृत्यू झाला. दुचाकीचेही नुकसान झाले. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.