पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या आवारात तोडफोड करण्यात आल्यानंतर या घटनेची माहिती बंदोबस्तावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरीत न कळविल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले. सचिन शंकर गाडेकर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाडेकर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रामायणवर आधारित नाटक सादर केले. नाटकात विडंबनाच्या नावाखाली अश्लील शब्द वापरण्यात आले होते, असा आरोप करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडले. त्यावेळी ललित कला केंद्राच्या आवारात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर शनिवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी ललित कला केंद्राच्या आवरात घोषणाबाजी करून शाईफेक केली. कार्यकर्त्यांनी खिडकीच्या काचा फोडल्या, तसेच कुंडया फोडून नुकसान केले. त्यावेळी ललित कला केंद्रात पोलीस उपनिरीक्षक गाडेकर बंदोबस्तास होते.

हेही वाचा…पुणे : विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या आवारात तोडफोड; भाजप युवा मोर्चाच्या बारा कार्यकर्त्यांवर गुन्हा

ललित कला केंद्राच्या आवारात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गाडेकर यांनी योग्य ती दखल घेतली नाही. तेथे शीघ्र कृती दलाला (रॅपिड ॲक्शन फोर्स) बोलाविले नाही, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त यांच्यासह नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती त्वरीत कळविली नाही. जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना कर्तव्यात कसुरी केली. अशा प्रकारच्या बेजबाबदारपणामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. पूर्व विभागाचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन गाडेकर यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police sub inspector suspended over delay in reporting pune university s lalit kala kendra vandalism to superiors pune print news rbk 25 psg