पुणे : ‘कांदाभजीची प्लेट ५० रुपयांना मिळते. तीच कोबीची भजी करून मन्च्युरियन म्हणून विकली तर तीनशे रुपये मिळतात. त्यामध्ये पैसे अधिक मिळत असले तरी पुरणपोळी, अळूची भाजी, कांदा भजी, थालीपीठ असे मराठमोळे पदार्थ आम्ही जाणीवपूर्वक देतो,’ अशी भावना ‘पूना गेस्ट हाउस’चे किशोर सरपोतदार यांनी शनिवारी व्यक्त केली.
‘पूना गेस्ट हाऊस’च्या ९० व्या वर्षपूर्तीनिमित्त विदिशा विचार मंचतर्फे सरपोतदार कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी किशोर सरपोतदार बोलत होते. प्रवीण मसालेवाले उद्योगसमूहाचे अध्यक्ष राजकुमार चोरडिया, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साधना सरपोतदार, अभय सरपोतदार, शर्मिला सरपोतदार, सनत सरपोतदार, अदिती सरपोतदार, ममता क्षेमकल्याणी आदी या वेळी उपस्थित होते.
जोशी म्हणाले, ‘प्रसिद्धीच्या झोतात आणि प्रतिष्ठेच्या शिखरावर असताना सर्वजण साथसोबत करतात. पण, कलावंतांच्या कठीण काळात त्यांची खंबीरपणे पाठराखण करणारी माणसे शोधावी लागतात. अडचणीत असणाऱ्या कलावंतांसह अनेक व्यक्तींना त्यांच्या कठीण काळात कायम आपलेपणाने आधार देणारी पूना गेस्ट हाउस ही संस्था म्हणजे कलावंतांना मायेची सावली देणारा आधारवड आणि हक्काचे माहेरघर आहे. यश आणि सेवेचा अनोखा मिलाफ पूना गेस्ट हाउसमध्ये आढळतो.’
चोरडिया म्हणाले, ‘भेसळ प्रतिबंध कायद्याच्या निमित्ताने चारूकाका सरपोतदार यांच्याशी माझा संपर्क आला. त्यांच्या पुढाकारातूनच खाद्यपेय विक्रेता संघ आणि हॉटेल व्यावसायिक यांना संघटनात्मक चेहरा मिळाला. भेसळ प्रतिबंध कायद्याचे काटेकोर पालन करणारे केवळ महाराष्ट्र हे एकच राज्य त्या काळी चारूकाकांमुळे पुढे आले होते. सरपोतदार कुटुंबीयांनी त्यांच्या अन्नपदार्थांबाबत राखलेली शुद्धता आणि दर्जा नातेसंबंधातदेखील कायम ठेवला. सामाजिक दातृत्वाचे अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवत पाच शाळा आणि दोन वृद्धाश्रमांचे नेतृत्व करीत सेवाभाव जपण्याचे काम सरपोतदार कुटुंबीय करीत आहेत.’
‘सरपोतदार कुटुंब हे कला, साहित्य, विचार, परंपरा, संस्कृती याचे पिढ्यान् पिढ्या हस्तांतर करणारे कुटुंब आहे. सामाजिक संवेदनशीलतेचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे पालकत्व पूना गेस्ट हाउसने निभावले,’ असे पांडे यांनी नमूद केले.