पुणे: देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले असून पुणे लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत पाहण्यास मिळणार आहे. त्यामध्ये भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे, एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी मिळाली आहे. या चार ही उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. या निवडणुकीच्या काळात प्रत्येक उमदेवार आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करताना दिसत आहे. त्याच दरम्यान एमआयएम पक्षाचा उमेदवार म्हणजे भाजपची ‘बी’ टीम असा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना केला होता.

त्या आरोपांना प्रत्युत्तर देताना एमआयएमचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके म्हणाले की, देशभरात कधी ही निवडणुका आल्या की, मुस्लिम, दलित या समाजातील व्यक्तिने काँग्रेस पक्षातील नेत्याकडे निवडणुक लढविण्याची इच्छा बोलवून दाखविली. तर त्याला संधी द्यायची नाही आणि त्या व्यक्तीला इतर पक्षाने निवडणुक लढविण्याची संधी दिल्यास, लगेच भाजपची टीम म्हणायचं, त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे प्रत्येक निवडणुकीवेळी ‘बी’ टीम म्हणायचा हाच एकमेव मुद्दा असतो.

हेही वाचा : “अमोल कोल्हेंमध्ये ‘मी’पणा ठासून भरला आहे म्हणूनच…”, शिवाजी आढळराव पाटील यांचे अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर

काँग्रेस पक्षातील नेत्यांना मी एक गोष्ट विचारू इच्छितो की, मागील ७० वर्षात काँग्रेस पक्षाने मुस्लिम, दलित या समाजासाठी काय केले. याबाबतच अगोदर उत्तर द्यावं, मुस्लिम आणि दलित समाजाला काँग्रेस पक्षाने आजवर वापरुन घेतले. निवडणुका आल्या की, या समाजातील नेत्यांना व्यासपीठावर केवळ भाषण करण्याची संधी दिली. आम्ही तुमच्यासोबत आहोत, या योजना आणू अशी केवळ आश्वासनं दिली गेली आहेत. त्यामुळे आम्ही भाजपची ‘बी’ टीम वैगरे नाही. तर मागील महिन्यांत काही पक्ष फोडून भाजपने सोबत घेतले आहेत. ते सर्व पक्ष भाजपची ‘बी’ टीम आहेत. त्या पक्षांना तुम्ही जाब विचारून दाखवा, ठाकरे गटासोबत जाणार्‍यांनी आमच्या पक्षाच्या ध्येयधोरणावर बोलू नये, अशा शब्दांत अरविंद शिंदे यांच्या विधानाचा अनिस सुंडके यांनी चांगलाच समाचार घेत पुढे म्हणाले की, पुणे लोकसभेच्या निवडणुकीत माझी लढत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि माझ्यात होणार असल्याचे सांगत पुन्हा एकदा अरविंद शिंदे यांना त्यांनी सुनावले.