पुणे : शहरात रात्रभर विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह कोसळणाऱ्या पावसाचा विमान सेवेला मोठा फटका बसला आहे. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर रात्री बारा वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत पावसामुळे हवाई सेवा विस्कळीत झाली.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार असलेली १४ विमाने अहमदाबाद, हैदराबात, सुरत, मुंबई या विमानतळांवर उतरविण्यात आली, तर विमानतळावरून उड्डाण घेतलेली तीन विमाने पुन्हा माघारी जात विमानतळावर उतरली. वळविण्यात आलेली सर्वाधिक सात विमाने हैदराबाद विमानतळावरच उतरविण्यात आली. मात्र, याचा प्रवाशांना फटका बसला असून प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
सद्यस्थितीला हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला असला, तरी सोमवारी (१५ सप्टेंबर) सकाळी आठ वाजल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार होणारी उड्डाणे काहीशा मिनिटांच्या फरकाने मार्गस्थ झाली, अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.
हवामान विभागाने पुणे शहरात काल ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. त्यानुसार पुणे शहर आणि विमानतळ परिसरात काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. खराब हवामानामुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवून आला. परराज्यातून आणि जिल्ह्यातून १७ विमाने रात्री उशिरा उतरणार असताना तीन विमाने पुणे विमानतळावर माघारी उतरली, तर १४ विमाने खराब वातावरणामुळे इतर ठिकाणच्या विमानतळांवर उतरविण्यात आली. विशेषतः पुणे विमानतळावरील ‘लष्करी ब्लॉक टाईम’ दरम्यान भारतीय हवाई दलाने पूर्ण सहकार्य केले. त्यांनी या कालावधीत विमानांच्या हालचालींना परवानगी दिली, ज्यामुळे विमानसेवा सुरळीत चालू राहण्यास मदत झाली. या सहकार्यामुळे प्रवाशांचा त्रास कमी होण्यास मदत झाली, असेही ढोके यांनी नमूद केले.
या कालावधीत विमानतळ प्रशासन, भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ), विविध विमान कंपन्या आणि इतर भागधारकांनी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून परिश्रम घेतले. प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, चहा, कॉफी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मात्र, विलंब आणि गैरसोयीबद्दल प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
खराब वातावरणाचा फटका बसलेली विमाने
विमानसेवा – वळविल्याचे ठिकाण
बेंगळुरू-पुणे-बेंगळुरू : हैदराबाद (तीन)
हैदराबाद-पुणे-चंदीगड : सूरत
कोलकत्ता-पुणे-कोयंबतूर : हैदराबाद ( सकाळी ६:३० वाजता पुण्यात परतले)
चेन्नई-पुणे-चेन्नई : मुंबईला वळवले.
बँकाॅक-पुणे-गोवा : हैदराबाद (सकाळी ७:४१ वाजता पुण्यात परतले)
हैदराबाद-पुणे-हैदराबाद : हैदराबादला माघारी
भोपाळ -पुणे-इंदूर : हैदराबाद
दिल्ली-पुणे-दिल्ली : हैदराबाद (सकाळी ९:३५ वाजता पुण्यात परतले)
नागपूर-पुणे-कोलकाता : अहमदाबाद
चेन्नई-पुणे-वडोदरा : हैदराबाद
दिल्ली-पुणे-दिल्ली : अहमदाबाद
जयपूर-पुणे-मोपा : हैदराबाद