पुणे : नगर रस्त्यावरील चंदननगर भागात एकाच कुटुंबातील तीन महिलांना गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीस हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
सोनाबाई अंकुश पवार (वय ५०), सुवर्णा अशोक पवार (वय २५), शालन कांतिलाल जाधव (वय ४५, तिघी रा. खुळेवाडी, चंदननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ विक्री प्रकरणी त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील उपनिरीक्षक नितीन राठोड आणि कर्मचारी चंदननगर भागात गस्त घालत होते. त्यावेळी खुळेवाडी परिसरात महिला गांजाची विक्री करत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून पवार, जाधव यांना ताब्यात घेतले.
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद शेळके, उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस कर्मचारी सना शेख, लालु कन्हे, हरीप्रसाद पुंडे, शैलेश नाईक, ज्ञानदेव आवारी, सचिन मांजरे, दादासाहेब बर्डे यांनी ही कारवाई केली. शहरात गांजा विक्री, तसेच तस्करीचे प्रकार वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी वानवडीतील साळुंखे विहार रस्ता परिसरात एका तरुणाला गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आली होती.
गांजा स्वस्त असल्याने अनेक तरुण गांजाचे सेवन करतात. उच्चशिक्षित, महाविद्यालयीन तरुण, सराइत तरुण गांजाच्या आहारी गेले आहे. सराइतांकडून गांजाच्या नशेत गंभीर गुन्हे घडतात. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात गांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.