पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हिवाळी हंगामाच्या वेळापत्रकात (विंटर शेड्यूल) नियमित २२० स्लाॅटव्यतिरिक्त १५ नवीन स्लाॅट सुरू करण्यात येणार असल्याचा दावा पुणे विमानतळ अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. मात्र, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) २६ ऑक्टोबरपासून जाहीर केलेल्या हिवाळी हंगामात नियमित विमानांच्या उड्डाणांव्यतिरिक्त एकही नवीन ‘स्लाॅट’ वाढविण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.

हिवाळी हंगामात पर्यटनासाठी पर्यटकांची विमान प्रवासाची मागणी मोठी असते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून हिवाळी हिंगामानिमित्त चार महिन्यांसाठी विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात येते. पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, ‘पुणे विमानतळ हवाई दलाचे असल्याने या विमानतळावरून प्रवासी विमानांच्या उड्डाणांना कालावधीच्या मर्यादा आहेत. तसेच, टर्मिनलची पुनर्बांधणी, स्लाॅटसाठी जागेची अनुप्लब्धता आणि इतर तांत्रिक कारणांमुळे पुणे विमानतळावरील मंजूर २२० स्लाॅटपैकी २०८ स्लाॅट सध्या वापरात आहेत. १२ स्लाॅट अद्याप सुरू झाले नसून, नवीन विमान उड्डाणांच्या मार्गांना मंजुरी मिळालेली नाही.’

‘सध्या पुणे विमानतळावरून नियमितपणे २०८ विमानांची उड्डाणे होत आहेत. ३४ देशांतर्गत ठिकाणे आणि दुबई आणि बँकाॅक य़ा दोन आंतराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे कायम ठेवली आहेत. ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ आणि ‘इंडिगो’ बँकॉकसाठी, तर ‘स्पाइसजेट’ व ‘इंडिगो’ दुबईसाठी दैनंदिन सेवेसाठी कायम राहणार आहेत, तर देशांतर्गत दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता यांसह अमृतसर, भोपाळ, रायपूर, रांची, सुरत येथील उड्डाणे नियमित वेळापत्रकाप्रमाणे कायम असणार आहेत,’ अशी माहिती पुणे विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

येत्या हिवाळी हंगामात नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडे (डीजीसीए) पुणे विमानतळावरून १५ अतिरिक्त स्लाॅट वाढवून देण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. मात्र, स्लाॅट कोंडी, मर्यादित कालावधी आणि वेळापत्रक अडचणींमुळे या स्लाॅटला मंजुरी मिळालेली नाही. भविष्यात विमानतळावरून नवीन उड्डाणे सुरू करण्यात येईल.- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

दर वर्षी हिवाळी हंगामात आम्ही आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन करत असतो. सिंगापूर, दुबईव्यतिरिक्त इतर ठिकाणी हिवाळी हंगामात नवीन उड्डाणे सुरू केली जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, कुठलीच जादा सेवा सुरू केली नसल्याने मुंबई, दिल्ली, नागपूर विमानतळावरून आता जावे लागेल. – धर्मेश शुक्ला, प्रवासी