पुणे : दिवाळीपूर्वी वातावरणातील उष्मा वाढला होता, तर रात्री गारव्याचा अनुभव आला. मात्र, बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील स्थितीमुळे ऐन दिवाळीत पावसाच्या सरी कोसळत आहेत. बुधवारी शहर आणि परिसरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या असून, २६ ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात निर्माण झालेला चांगला विकसित कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची, तसेच पश्चिम-उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अरबी समुद्रातही विकसित होत असलेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन उत्तर-पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. परिणामी, पुणे शहर आणि परिसरात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आहे. बुधवारी, तसेच आज (गुरुवारी) ऊन आणि ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश दुपारनंतर ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे.