पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे.यामुळे धरण साठ्यात कमालीची वाढ असून त्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 35310 क्युसेक पाण्याचा वाढवून सकाळी 10.00 वाजता 39138 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नदी पात्रालगत राहणार्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र काल रात्री पासून सिंहगड रोड वरील एकतानगरी सोसायटी परिसरात पाणी जाण्यास सुरुवात झाली. त्या भागातील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. मात्र त्या भागातील काही सोसायटीमधील नागरिकांना प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील नागरिक बाहेर पडत नाही.
त्या नागरिकांपैकी नंदा कांबळे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या,मागील वर्षी देखील एकतानगरी भागातील सोसायटयामध्ये तब्बल दोन दिवस पाणीच पाणी झाले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी येऊन आश्वासन दिले होते की,नदी पात्रालगत भिंत उभारू, आवश्यक त्या उपाययोजना करू असे सांगितले होते. त्यावेळी निवडणुका होत्या, म्हणून मोठ मोठी आश्वासन देऊन ते निघून गेले. पण पुढे काहीच केले नाही. मी काही लाडक्या बहिण योजनेचा फॉर्म भरला नाही. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक वेळी म्हणतात, तुम्ही लाडक्या बहिणी आहात, नुसत्या लाडक्या बहिणी म्हणू नका आमच्याकडे लक्ष द्या,आमची व्यवस्था करा, जोपर्यंत एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार नाहीत. तोपर्यंत आम्ही येथून हलणार नसल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.