पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येईल. वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित रस्ते आणि संबंधित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्व शासकीय अस्थापनांसाठी ‘‘सिंगल पॉइंट ऑथॉरिटी’’ तयार केली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींसोबत गुरुवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला भाजपाचे आमदार महेश लांडगे, आमदार शंकर मांडेकर, आमदार शंकर जगताप उपस्थित होते. आयटी फोरमचे सचिन लोंढे, सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यासोबत थेट चर्चा केली.
बाणेर-बालेवाडी रेसिडेन्ट असोसिएशन, #UNCLOGHinjawadiITPark मोहीमेतील प्रतिनिधी, फोरम ऑफ आयटी एम्प्लॉइज, हिंजवडी एम्प्लॉइज ॲन्ड रेसिडेन्ट ट्रस्ट, मुळशी को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशनचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे, राज्य सरकाचे मुख्य सचिव, एमआयडीसी, प्रोजेक्ट डायरेक्टर नॅशनल हायवे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाची तयारी आणि कार्यवाहीची माहिती दिली.
या वेळी पीएमआरडीए प्रशासनाकडून प्रस्तावित रस्ते आणि संबंधित कामांचा ‘रोड मॅप’ याबाबत मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्यासमोर सादरीकरण दिले. तसेच, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून हिंजवडीला जोडणारे डीपी प्रस्तावित रस्ते पूर्ण करण्यासाठी भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने कामाला गती द्यावी, राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची प्रस्तावित कामे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत समन्वय करणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
सर्व विभागांच्या समन्वयासाठी ‘‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’’, भू संपादनाच्या कामासाठी पीएमआरडीएने पुढाकार घ्यावा, लक्ष्मी चौक येथील पूल सहापदरी करावा. डिसेंबरअखेर हिंजवडी मेट्रो सुरू करावी, एमआयडीसीने रस्ता रुंदीकरणाची कामे पूर्ण करावीत मेट्रो प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था करावी, एक महिन्यामध्ये टीडीआर द्यावा आणि भूसंपादन करावे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियंत्रण करावे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने वाहतूक संदर्भात अंमलबजावणी करावी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने तातडीने कामे सुरू करावीत, पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक भुयारी मार्गाचे काम सुरू करावे.