पुणे : ‘वाहनचालकांना होणारा त्रास कमी करून रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात तसेच सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात आले आहे. या उड्डाणपुलाच्या कामामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून या भागातून ये- जा करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

या दोन्ही उड्डाणपूलांची कामे पूर्ण झालेली आहेत. मात्र ते वाहतुकीसाठी सुरू केले जात नसल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या दिरंगाई मुळे या भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्याचा मनस्ताप वाहनचालकांना होतो. पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलासह सिंहगड रस्त्यांवरील काम पूर्ण झालेल्या उड्डाणपुलाचा भाग तातडीने खुला करावा,’ अशी मागणी काँग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गणेशखिंड रस्त्यांसह सिंहगड रस्त्याला उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. या दोन्ही उड्डाणपुलांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, या दोन्ही पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा हट्ट शहर भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतरही हे दोन्ही उड्डाणपूल सुरू केले जात नसल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जोशी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन त्यांना हे दोन्ही उड्डाणपूल सुरू करण्याची विनंती केली आहे.

हे दोन्ही उड्डाणपूल सुुरू करण्यासाठी भाजपच्या ‘इव्हेंट’ ची वाट पाहत बसू नका, वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी तातडीने हे पूल सुरू करावेत, असे पत्र जोशी यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कामाचे श्रेय घेण्यासाठी काम पूर्ण झाल्यानंतरही हे दोन्ही पूल सुरू केले जात नसल्याची तक्रार जोशी यांनी केली. महापालिका आयुक्तांनी तातडीने यामध्ये लक्ष घालून हे दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले न केल्यास काँग्रेसला आंदोलन करावे लागेल, असा इशारा जोशी यांनी दिला आहे.

माजी आमदार मोहन जोशी म्हणाले, सत्ताधाऱ्यांना उड्डाणपूल उद्घाटनानिमित्त एक ‘इव्हेंट’ करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकारण साधायचे आहे. या वृत्तीला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. प्रशासनाने हे पूल तातडीने वाहतुकीसाठी सुरू करावेत. राज्यात भाजपचे सरकार आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून भाजप सरकार किती कार्यतत्पर आहे हे दाखविण्याचा प्रयत्न सतत केला जातो. मग या दोन्ही उड्डाणपूलांची कामे पूर्ण झालेली असतानाही त्याचे उद्घाटन ठराविक नेत्याच्या हस्ते करण्याचा हट्ट का धरला जात आहे? अशी विचारणा देखील जोशी यांनी केली आहे.