पुणे : दिवाळीत परगावी निघालेल्या एसटी प्रवासी महिलेकडील दागिने चोरणाऱ्या तीन महिलांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून रोकड, तसेच सोन्याचे दागिने असा चार लाख १२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आशा देविदास लोंढे (वय ६०), रेखा मनोहर हातागंळे (वय ३५) आणि हेमा दिगंबर हातागंळे (वय ४१, तिघी रा. लोणी काळभोर रेल्वे स्थानकाजवळ) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
दिवाळीत मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी एसटी स्थानकातून परगावी निघालेल्या प्रवाशांकडील दागिने, रोकड चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत होता. प्रवाशांकडील ऐवज चोरणाऱ्या महिला वाकडेवाडी येथील पीएमपी थांब्यावर थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून दागिने चोरल्याची कबुली दिली.
तक्रारदार महिला नाशिकहून सांगलीकडे निघाली होती. वाकडेवाडी एसटी स्थानकात उतरल्यानंतर ती पीएमपी बसने कात्रजकडे निघाली होती. कात्रज एसटी थांब्यावरुन महिला सांगलीकडे जाणार होती. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस कर्मचारी हरिष मोरे, एकनाथ जोशी, संजय आढारी, प्रवीण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, भरत गुंडवाड, मयुरी नलावडे, रजपूत यांनी ही कामगिरी केली.
