पुणे : बिबवेवाडीत वैमनस्यातून गुंडावर पिस्तुलातून गोळीबार करुन पसार झालेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणात अटक करण्यात आलेले तिघे सराइत असून, मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना दिली. सनी शंकर जाधव, सलमान उर्फ सल्या हमीद शेख, हर्षल संतोष जाधव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्यबरोबर असलेल्या सात ते आठ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी केलेल्या गोळीबारात पवन सतीश गवळी (वय २८, रा. बिबवेवाडी ओटा परिसर) जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवन आणि साथीदारांनी २०२१ मध्ये वैमनस्यातून सराइत माधव वाघाटे याचा खून केला होता. खून प्रकरणात दोन महिन्यांपूर्वी त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास दुचाकीस्वार पवन बिबवेवाडी भागातून निगाला होता. आरोपी सनी,सलमान, हर्षल आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सात ते आठ साथीदारांनी दुचाकीस्वार पवनला अडविण्याचा प्रयत्न केला. त्याच्यार पिस्तुलातून गाेळीबार केला. आरोपींबरोबर असलेल्या साथीदारांनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत पवन बिबवेवाडी पोलीस ठाण्यात पोहोचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. रात्री उशीरा तिघांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune crime updates pistol firing on goons in bibwewadi area case against 8 accused pune print news rbk 25 css