पुणे : शहरातील नागरी सुविधा केंद्र (सेतू) आणि महा ई-सेवा केंद्रात सातत्याने होणाऱ्या तांत्रिक बिघाडाचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असल्याने ते वेळेत मिळत नसल्याने प्रलंबित प्रकरणांची संख्याही वाढत आहे.

दरम्यान, महा ई-सेवा केंद्राचा सर्व्हर डाऊन होत असल्याने कामकाज करण्यावरही मर्यादा येत असल्याने विविध प्रकारचे दाखले देण्यास अडचणी येत आहेत, असा दावा केंद्र चालकांकडून करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील निवेदनही महा ई-सेवा केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे. सेतू कार्यालय आणि महा ई-सेवा केंद्राचे सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने कामकाज पूर्ण बंद होत आहे. ऑनलाइन प्रक्रियेमध्ये वारंवार अडचणी येत आहेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी महा ई-सेवा केंद्र चालकांचे लॉगिन हे एकापेक्षा जास्त प्रणालीवर करता येणे शक्य होते. मात्र अलीकडे एक लाॅगिन प्रणालीची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे महा ई-सेवा किंवा सेतू केंद्र चालकांना कामकाज करण्यास मर्यादा येत आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. एका लाॅगिनवर सर्व प्रकारचे कामकाज करणे केंद्र चालकांसाठी अडचणीचे ठरत आहे.

सध्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने अनेक प्रकारच्या दाखल्यांसाठी सेतू कार्यालय आणि महा ई-सेवा केंद्रांकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे दिल्यानंतरही दाखले वेळेत उपलब्ध होत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

दरम्यान, एकाच लाॅगिन प्रणालीमुळे एकाच संगणकावर काम करावे लागत आहे. त्यामुळे कामे प्रलंबित राहत आहेत. प्रणालीतील त्रुटींमुळे कार्यालयीन वेळेत दिवसभर केवळ अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्जांची ऑनलाइन प्रक्रिया होत नसल्यामुळे दाखले तयार करण्यासाठी सुटीच्या दिवशी किंवा रात्री उशिरा काम करावे लागत आहे. दरम्यान, सुटीच्या दिवशी महा ई-सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयांना दाखले देण्यासाठीच्या शिबिरांचे आयोजन करावे लागत आहे. त्यामुळेही कामाचा ताण वाढत असल्याचा दावा केंद्र चालकांकडून करण्यात आला आहे.

महा ई-सेवा केंद्रांचा सर्व्हर सातत्याने डाऊन होत आहे. त्यामुळे दाखल्यांची प्रलंबित संख्याही वाढत आहे. ही समस्या तातडीने सोडविण्यात यावी, असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे. – सुवर्णा भरेकर, केंद्र चालक

एकाच लाॅगिन प्रणालीमुळे एकाच संगणकावर काम करावे लागत आहे. त्यामुळे सर्वप्रकारचे कामकाज प्रलंबित राहत आहे. प्रणालीतील त्रुटींमुळे कार्यालयीन वेळेत दिवसभर केवळ अर्ज स्वीकारले जात आहेत – राहुल वडघुले, केंद्र चालक

सर्व्हर डाऊन होण्याबरोरच अन्य काही तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र त्या दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महा ई-सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयातून दाखले देण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे. त्यातूनही काही अडचणी आल्यास जिल्हा प्रशासनाकडून त्याची तातडीने दखल घेत कार्यवाही केली जात आहे. – ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी