पुणे : सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ (पी.ओ.पी.) श्री गणेश मूर्तीची विक्री करताना विक्रेत्यांना त्याची नोंद ठेवणे आणि मूर्तीच्या मागील बाजूस स्पष्टपणे दिसेल अशा स्वरुपात ऑईल पेंटने लाल रंगाचे गोलाकार चिन्ह करणे बंधनकारक राहणार आहे. महापालिकेनेही गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन केले आहे.
महापालिकेच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पीओपी’च्या मूर्तींची विक्री करताना आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे पत्रक महापालिका प्रशासनाने तयार केले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.
‘‘पीओपी’च्या सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित करावे, सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या मूर्तीऐवजी प्रतीकात्मक स्वरुपात लहान मूर्तींचे विसर्जन करावे, सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल, तर ती मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करावी. मात्र, ही मूर्ती शाडू माती, चिकणमातीची असावी,’ या सूचना करण्यात आल्या आहेत.
‘गणेश मूर्तीचे दागिने बनविण्यासाठी वाळलेली फुले, पेंढा यांचा वापर करावा आणि मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने रेझीन्सचा चमकदार सामग्री वापरावी. मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल रंग, जैव विघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा, नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावेत,’ असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पदपथ अडथळे मुक्त करणार
गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना चालण्यासाठी पदपथ अडथळे मुक्त केले जाणार आहेत. तसेच, विसर्जन घाटावरील हौदाची स्वच्छता करण्याचे काम तातडीने करावे, अशा सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
उत्सवाच्या काळात विसर्जन घाटावर विजेचे दिवे आणि जनरेटरची सोय केली जाणार आहे. तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घाटावर सीसीटीव्ही बसविले जाणार आहे. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्ती संकलित केल्या जाणार आहेत. यासाठी लवकरच स्वंयसेवी संस्थाची बैठक घेतली जाणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
आज संयुक्त बैठक
गणेशोत्सवासाठी पालिका आणि पोलीस आयुक्त यांची संयुक्त बैठक आज (मंगळवारी) होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे ही बैठक होणार असून, यासाठी गणेश मंडळाना बोलविण्यात आले आहे.