माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मोठा मुलगा आयुष (वय २०) याचा ५ सप्टेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास खून करण्यात आला. आयुषवर पिस्तुलातून ११ गोळ्या झाडल्या गेल्या. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला टोळीयुद्धातून घडलेली ही घटना थरकाप उडविणारी होती. यामुळे नाना पेठेत घबराट उडाली. या भागातील मंडळांनी लगोलग देखावे बंद केले. गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना गजबजलेल्या नाना पेठेत शांतता पसरली.

पुणे शहरात टोळीयुद्धातून भरदिवसा खून होण्याच्या होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. बाळू आंदेकर, प्रदीप सोनवणे, संदीप मोहोळ, अश्रफ रामपुरी, अप्पा लोंढे, रफिक शेख, संदीप मोहोळ, शरद मोहोळ यांचे टोळीयुद्धातून भरदिवसा खून झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. त्यामुळे शांत शहर ही पुण्याची ओळख केव्हाच पुसली गेली आहे.

शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात बाळू आंदेकर याचा गुंड प्रमोद माळवदकर आणि साथीदारांनी १५ जुलै १९८४ रोजी खून केला होता. बाळू आंदेकर खून प्रकरणानंतर शहरात टोळीयुद्धाचा भडका उडाला. या खून प्रकरणानंतर आंदेकर-माळवदकर टोळीयुद्धातून पुणे शहरात भरदिवसा सहा खून झाले होते. १९९० च्या दशकात पुणे शहराचा विस्तार झाला. मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांनी पुण्यातील जमीन व्यवहारात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. गुंड प्रदीप सोनावणे, मनोज कुडले, अश्रफ रामपुरी, दीपक देव, राजा मारटकर, रफिक शेख, संदीप मोहोळ, महेश मेंगडे यांचे भरदिवसा खून झाले.

अरुण गवळी टोळीतील गुंड किरण वालावलकर आणि रवी करंजावकर हे २५ जानेवारी ९५ रोजी कोंढवा परिसरात झालेल्या पोलीस चकमकीत मारले गेले. लष्कर भागातील गुंड अश्रफ रामपुरी याने वालावलकर आणि करंजावकर यांची माहिती पोलिसांना दिली असावी, असा संशय गवळी टोळीला होता. त्यातून गवळी टोळीतील गुंडांनी २७ जानेवारी १९९६ रोजी रेसकोर्सवर भरदिवसा गोळ्या झाडून अश्रफचा खून केला.

मुंबईतील अश्विन नाईक टोळीने पुण्यात बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. गवळी टोळीचा निकटवर्तीय असल्याच्या संशयावरून दीपक देव याचे १ ऑक्टोबर १९९७ रोजी सकाळी शिवाजीनगरमधील वाकडेवाडीत असलेल्या घरातून अपहरण करण्यात आले. नाईक टोळीतील गुंडांनी सातारा जिल्ह्यातील खानापूरजवळच्या जंगलात गोळ्या घालून त्याचा खून केला होता.

खडकी परिसरात दहशत असलेल्या राजा मारटकर याचा १८ ऑगस्ट १९९८ रोजी खडकीत खून झाला. मारटकर याने १९७८ मध्ये तंबी गौस याचा तेथील कॅरम हाउसमध्ये खून केला होता. गौस याच्या मुलाने तब्बल २० वर्षांनंतर मारटकर याचा खून करून वडिलांच्या खुनाचा बदला घेतला. संदीप मोहोळ याने पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात दबादबा निर्माण केला होता.

पैलवान या टोपणनावाने तो ओळखला जात होता. अल्पावधीत संदीप मोहोळने पुणे शहर आणि जिल्ह्यात दबदबा निर्माण केला. अनिल मारणे, सुधीर रसाळ यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अनिल मारणे टोळीतील सराइतांनी गजबजलेल्या पौड फाटा परिसरात ४ ऑक्टोबर २००४ रोजी पिस्तुलातून गोळीबार करून मोहोेळचा खून केला होता.

१९८०-९० च्या दशकात मुंबईतील टोळ्यांमधील संघर्षातून अनेकांचे बळी गेले. टोळीयुद्धाची झळ सामान्यांना बसली. गुंड टोळ्यांविषयी आकर्षण, झटपट पैसे कमाविण्याच्या मोहापोटी अनेक तरुण टोळ्यांसाठी काम करू लागले. मुंबई पोलिसांनी टोळीयुद्धाचा बीमोड केला. पुण्यात फारशी वेगळी परिस्थिती नाही. टोळीयुद्धाची झळ सामान्यांना पाेहोचली नसली, तरी भरदिवसा होणारे खून, वाहनांची तोडफोड, दहशत माजविण्याच्या घटनांमुळे सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे शहरात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात सर्वाधिक गुन्हेगारी टोळ्या असलेले शहर अशी ओळख पुण्याने निर्माण केली आहे. पुण्यातील टोळ्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

rahul.khaladkar@expressindia.com