पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचे संकेत देणारे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याने त्या दृष्टीने अजित पवार यांनी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार अशी होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती विधानसभेची जागा न लढण्याचे संकेत बारामती येथील मेळाव्यात गुरुवारी दिले होते. ‘मी उमेदवार देईन, त्यालाच निवडून द्या,’ असे सूचक वक्तव्य पवार यांनी केले होते. त्यामुळे बारामतीचा उमेदवार कोण असेल, याचबरोबर अजित पवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याबाबत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केल्याचे पुढे आले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या सूत्रांकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला. कर्जत-जामखेड मतदारसंघातूनही अजित पवार निवडणूक लढवतील, अशी चर्चा सातत्याने होत होती. मात्र, शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत पवार सकारात्मक असल्याचे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-Raj Thackeray in Pune : “महाराष्ट्रात असे लोक आहेत, ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत” राज ठाकरेंचा टोला

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता. हा पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी, त्यांनी ‘बारामतीमधून निवडणूक लढविण्यात आता रस राहिलेला नाही,’ असे विधान करतानाच, ‘कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि संसदीय समितीने मान्यता दिली तर, जय पवार यांना बारामतीमधून उमेदवारी दिली जाईल,’ असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यांच्या या विधानानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, ‘बारामती हा अजित पवार यांचा डीएनए आहे. ते बारामतीमधूनच लढतील,’ असे स्पष्ट केले होते.

शिरूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अशोक पवार विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांनी शरद पवार यांच्या समवेत राहण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिरूरमध्ये झालेल्या मेळाव्यात त्यावरून अजित पवार यांनी विद्यमान खासदार आणि आमदारांना आव्हान दिले होते. ‘मंत्रिपद तर लांबच, आमदारच कसे होतो ते मी पाहतोच,’ असा इशारा अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांना दिला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास अशोक पवार यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.

आणखी वाचा-व्हिडीओ: चिंचवडमध्ये हृदयात स्क्रू ड्रायव्हर भोसकून हत्या

अजित पवार जिल्ह्याचे तसेच राज्याचे प्रमुख नेते आहेत. त्यांना राज्यातील प्रत्येक मतदारसंघाची जाण आणि खडान् खडा माहिती आहे. ते केवळ बारामती किंवा शिरूरमधूनच नव्हे, तर राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी होऊ शकतात. -प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune guardian minister ajit pawar is likely to contest elections from shirur constituency pune print news apk 13 mrj