पुणे : हडपसर भागातील वैभव चित्रपटगृहाजवळ असलेल्या जुन्या तीन मजली इमारतीतील गोदामात दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्परतेने दोन लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका केेल्याने मोठी दुर्घटना टळली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे-सोलापूर रस्त्यावर वैभव चित्रपटगृहाजवळ भीमाशंकर सहकारी गृहरचना संस्था ही जुनी तीन मजली इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर एका व्यावसायिकाचे दुकान आहे. तिसऱ्या मजल्यावर एका खोलीचा वापर व्यावसायिकाडून गोदाम म्हणून करण्यात येत होता. गोदाम, तसेच जिन्या मोठ्या प्रमाणावर लाकडी फोटो फ्रेम ठेवण्यात आल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर असलेल्या गोदामातील लाकडी साहित्याने पेट घेतला. मोठ्या प्रमाणावर धूर आल्याने रहिवासी घाबरले. या घटनेची माहिती त्वरीत अग्निशमन दलाच्या हडपसर केंद्राला कळविण्यात आली.

हेही वाचा : स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला

अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रमोद साेनवणे,अनिल गायकवाड आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग भडकल्याने रहिवासी भयभीत झाले. तिसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेत अडकलेल्या दाेन मुलांसह एका महिलेची जवानांनी सुटका केली. त्यानंतर इमारतीतील आणखी चार रहिवाशांची सुटका केली. अग्निशमन दलाचे तीन बंब, रेस्क्यू व्हॅन, टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. जवानांनी पाण्याचा मारा करुन वीस ते पंचवीस मिनिटात आग आटोक्यात आणली. आगीामागचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही, असे अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune hadapsar old building fire break out seven residents including children rescued pune print news rbk 25 css