पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघातील निकालासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल असल्याने या मतदारसंघाची नियोजित मत पडताळणी तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही पडताळणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्त केवळ खडकवासला विधानसभा मतदारसंघातील अवघ्या दोन मतदान यंत्रांमधील मतांचीच पडताळणी केली जाईल, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पराभूत उमेदवार, विद्यमान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निवडणुकीच्या निकालासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. ही बाब जगताप यांनीच जिल्हा निवडणूक शाखेच्या निदर्शनास आणून दिली होती.
त्यानुसार हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतांची पडताळणी करण्यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे पत्राद्वारे विचारणा केली होती. चोक्कलिंगम यांनी ही पडताळणी रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे तूर्त हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतपडताळणी होणार नसल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर ही पडताळणी होऊ शकते, अशी शक्यताही निवडणूक शाखेकडून वर्तविण्यात आली आहे.
शहरातील हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांतील पराभूत उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपानंतर या दोन मतदारसंघांतील मतदान यंत्रांची (ईव्हीएम) तपासणी आणि पडताळणी करण्यात येणार होती. ही प्रक्रिया येत्या शुक्रवारपासून भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामात सुरू करण्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून कळविण्यात आले होते. कंट्रोल युनिटमधील रिझल्ट बटन दाबून प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळाली आहेत, हे यावेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना दाखविले जाणार असून मतांच्या ‘व्हीव्हीपॅट स्लिप’ची तपासणी होणार नसल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आता हडपसर विधानसभा मतदारसंघाची मतपडताळणी रद्द झाल्याने केवळ खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतांची पडताळणी होणार आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंगातील केवळ दोन मतदान यंत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
राज्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विधानसभेसाठी निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसांच्या आत ईव्हीएम यंत्रांची, बर्न्ट मेमरी, कंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी ११ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी तसे अर्ज केले होते. त्यानंतर पाच पराभूत उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उर्वरित सहा उमेदवारांपैकी चार मतदारसंघांमध्ये निवडणूक याचिका दाखल आहे.