पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते दापोडीपर्यंत मेट्रो धावत आहे. मेट्रो स्थानकाखाली वाहनतळाची सुविधा नसल्याने वाहने बेशिस्तपणे पदपथ व रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीस, पादचाऱ्यांना अडथळे निर्माण होत असताना आता स्थानकांजवळ वाहनतळ उभारले जाणार नसल्याचे पुणे महामेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परिणामी, वाहतूक कोंडी, वाहनतळाची समस्या कायम राहण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी अशी सहा मेट्रो स्थानके आहेत. त्यापुढे स्वारगेट तसेच, वनाज व रामवाडीपर्यंत मेट्रोने ये-जा करता येते. पिंपरीपासून निगडीतील भक्ती-शक्तीपर्यंत मेट्रोचा विस्तार केला जात आहे. मेट्रोतून प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पिंपरी मेट्रो स्थानक येथून महामेट्रोला सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे. मात्र, मेट्रो स्थानकाखाली वाहनतळ नाही. मेट्रोने सशुल्क वाहनतळाची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात उभारले नाही. वाहनतळ नसल्याने प्रवासी पदपथ व रस्त्याच्या कडेला वाहने लावत आहेत.
सकाळी सहापासून रात्री बारापर्यंत मेट्रो स्थानकाखाली तसेच, परिसरात वाहने उभी असतात. त्यातच रिक्षाचालक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारी स्थानकाभोवती गर्दी करत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. मोरवाडी चौकात चारही बाजूंनी वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मेट्रो प्रवाशांनी घर किंवा कामाच्या ठिकाणापासून खासगी वाहनाने न येता, बस, रिक्षाने यावे. त्यामुळे वाहनतळाची गरज भासणार नाही, असे महामेट्रोचे मत आहे. वाहनतळ सुरू केले, तर मेट्रोच्या तिकिटापेक्षा भाडेदर जास्त असल्याची तक्रार येते. त्यामुळे वाहनतळ विकसित करणे शक्य नसल्याचे महामेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले.
पर्यायी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन
मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी स्वत:चे खासगी वाहन वापरू नये. त्यांनी घर किंवा कामाच्या ठिकाणाहून निघताना पीएमपीएमएल बस किंवा रिक्षा या पर्यायी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. त्यामुळे त्यांना वाहनतळाची गरज भासणार नाही, असे आवाहन मेट्रोने केले आहे.
प्रवासी सकाळी मेट्रो स्थानक परिसरात वाहन उभे करून जातात. रात्री उशिरा वाहने घेऊन जातात. त्यामुळे वाहनतळाची जागा दिवसभर अडकून पडते. इतर प्रवाशांच्या वाहनांना जागा उपलब्ध होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून स्थानक परिसरात वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही, असे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.