पुणे : मेट्रोची गरवारे महाविद्यालय ते डेक्कन मेट्रो स्थानक आणि फुगेवाडी ते दापोडी मेट्रो स्थानक दरम्यानची यशस्वी चाचणी सोमवारी घेण्यात आली. शहरातील उन्नत मेट्रो प्रकल्पाचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचा दावा महामेट्रोने केला आहे. नव्या मार्गांवरील स्थानकांचे कामही तत्पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक आणि पिंपरी चिंचवड महानगपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी गरवारे महाविद्यालय ते डेक्कन जिमखाना स्थानक या दरम्यानच्या ८१० मीटरवर मेट्रोची चाचणी झाली. तसेच फुगेवाडी मेट्रो स्थानक ते दापोडी मेट्रो स्थानकादरम्यानही चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे पुढील काही महिन्यांत गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानकाच्या पलीकडे शिवाजीनगर न्यायालय स्थानक आणि फुगेवाडी स्थानक येथून शिवाजीनगर स्थानकापर्यंतच्या मार्गावर मेट्रो धावू शकणार असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका

सध्या कार्यरत असलेल्या गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानकापासून डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत आणि परतीच्या प्रवासाला सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली. तसचे फुगेवाडी स्थानकातून दापोडी मेट्रो स्थानकाकडे मेट्रो त्याच वेळेस धावली. दोन्ही गाड्यांच्या चाचणीचा वेग ताशी १५ किलोमीटर होता. आता पुढील टप्प्यात डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान, महापालिका भवन आणि शिवाजीनगर न्यायालय स्थानकाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. शहरातील उन्नत मेट्रो प्रकल्पाचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे महामेट्रोचे महासंचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

‘येत्या काही महिन्यांत मेट्रोचे उर्वरित मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. दोन्ही मार्गांवरील पहिल्या चाचण्या यशस्वी झाल्या असून यापुढेही चाचण्या होतील,’ असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्वातंत्र्य दिनी दोन्ही शहरातील मेट्रो मार्गांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन्ही शहरांत एकाच दिवसात ८७ हजार ९३३ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. यापूर्वी एकाच दिवशी ६७ हजार २८० प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला होता. १५ ऑगस्ट रोजी अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी सहली आयोजित केल्या होत्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune metro trial run from garware college to deccan metro station and phugewadi to dapodi pune print news zws
First published on: 16-08-2022 at 22:03 IST