पुणे : भारतीय सैन्य दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच १७ महिला छात्रांची तुकडी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) पदवीधर झाली. विशेष म्हणजे, पहिल्याच तुकडीतील कॅप्टन श्रिती दक्ष हिने कला शाखेत सर्व छात्रांत प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे महिला छात्रांच्या पहिल्याच तुकडीने इतिहास घडवला.
सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२१मध्ये दिलेल्या आदेशामुळे महिलांना ‘एनडीए’चे दरवाजे खुले झाले. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) अत्यंत काटेकोर प्रवेश प्रक्रिया राबवली. त्यातून १९ महिला छात्रांची पहिल्या तुकडीसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर १९ पैकी १७ छात्रांनी तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पदवी प्राप्त केली. छात्रांना दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. पूनम टंडन यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. ‘एनडीए’चे प्रमुख व्हाइस ॲडमिरल गुरचरण सिंग, प्राचार्य प्रा. ओमप्रकाश शुक्ला या वेळी उपस्थित होते.
कला शाखेत प्रथम क्रमांक मिळवलेली कॅप्टन श्रिती दक्ष नोएडाची आहे. तिने दहावीत ९७ टक्के, तर बारावीत ९९ टक्के गुण मिळवले होते. तिचे वडील योगेशकुमार दक्ष हवाई दलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झाले. तेही ‘एनडीए’च्या ८६ व्या तुकडीचे स्नातक आहेत. तिची आई शिक्षिका असून, मोठी बहीणही हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे.
‘सुरुवातीच्या काळात ‘एनडीए’तील वातावरणाशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागला. मात्र, शिक्षक, मार्गदर्शकांनी खूप मदत केली. माझ्या कामगिरीचे श्रेय मी माझी आई आणि माझ्या शाळेला देईन. मी माझ्या घरातील लष्करी सेवेचा वारसा पुढे नेत आहे. मी आता इंडियन मिलिटरी ॲकॅडमी (आयएमए) येथे पुढील प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे. माझे हे यश सशस्त्र सैन्य दलांत येऊ पाहणाऱ्या मुलींना निश्चित प्रेरणा देईल, असा विश्वास वाटतो,’ अशी भावना श्रितीने व्यक्त केली.
नेतृत्व हे पद, अधिकार, लिंग यांवर नाही, तर चारित्र्यावर ठरते. वैयक्तिक आचरणातून इतरांना दिशा देतो, स्वतःच्या हितापेक्षा इतरांच्या कल्याणाला अधिक महत्त्व देतो, तो खरा नेता असतो. पदवीधर होत असलेली महिला छात्रांची तुकडी, त्यांचे पुरुष सहकारी आपले आदर्श नेतृत्व सिद्ध करतील, याची मला खात्री आहे. – व्हाइस ॲडमिरल गुरचरण सिंग, प्रमुख, एनडीए
तुम्ही मुलींनी केलेली कामगिरी भारतभरातील हजारो मुलींसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही परिवर्तन, धैर्य आणि निर्धाराचे उदाहरण आहात. सर्वोत्कृष्टता आणि सेवेचा ध्यास कशाहीपुरता सीमित नसतो, हे तुम्ही सिद्ध केले आहे. तुम्ही पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरला आहात. तुमची जिद्द आणि निर्धाराला सलाम आहे.- प्रा. पूनम टंडन, कुलगुरू, दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठ