राज्यामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपा युतीत फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकारचा जन्म झाला. याचसंदर्भात लोकसत्ताच्या ‘दुष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवाद मालिकेमध्ये शुक्रवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना अजित पवारांसोबत स्थापन केलेलं सरकार एक चूक होती असं मान्य केलं. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपल्याचंही म्हटलं. यावरच आज शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीची मोट बांधण्यात आघाडीवर असणारे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांनी या विषयावर बोलताना शिवसेना खंजीर खुपसणाऱ्यांमधील नसून समोरुन वार करणारी असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्या दिवशी अजित पवारांच्या मदतीने फडणवीस यांनी सत्ता स्थापन केली त्यावेळीच आम्ही ही चूक असल्याचं सांगत होतो आणि अजित पवार पुन्हा आपल्याकडे येतील असा विश्वास व्यक्त केला होता, असं राऊत म्हणालेत. “जेव्हा ते शपथ घेत होते, तेव्हाही मी सांगत होतो की, अजित पवार संध्याकाळी पुन्हा आपल्याकडे परत येतील. हे सांगणारा मी पहिला माणूस होतो. त्यांनी जी सकाळी सात वाजता शपथ घेतली असेल. त्यानंतर सकाळी दहा वाजता मी सांगत होतो की असं (भाजपा राष्ट्रवादी सरकार टीकण्यासंदर्भात) काही नाही होणार नाही, मोठी चूक करत आहात. संध्याकाळपर्यंत अजित पवार व त्यांची सगळी लोकं पुन्हा आपल्या घरट्यात परत येतील,” असं आपण म्हणालो होतो आणि तेच खरं झाल्याचं राऊत यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी उद्धव मोदींना पत्र लिहितील म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांचं उत्तर; म्हणाले…

शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याच्या आरोपावर भाष्य करताना राऊत यांनी, जे शिवसेनेला ओळखतात त्यांना ठाऊक आहे बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना घडवली, त्यामध्ये पाठीत खंजीर खुपसण्याला स्थान नाही. आम्ही समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो, आम्ही समोरून वार करतो. छातीवर वार करतो व छातीवर वार झेलतो. परिणामाची पर्वा करत नाही, असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> मनसे भाजपा युती होणार का?; फडणवीस म्हणाले, “मनसेने हिंदुत्व…”

फडणवीस यांनी काय वक्तव्य केलेलं?

भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद झाल्यानंतर पडद्यामागून अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण पाठिंब्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे हे सरकार चार दिवसांत गडगडलं. पण तो निर्णय चुकीचाच होता, असं फडणवीस लोकसत्ताच्या ‘दुष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवाद मालिकेत म्हणाले. “राष्ट्रवादीसोबतचं सरकार करायला नको होतं. ती चूक आहे. असं सरकार आम्ही स्थापन करायला नको होतं”, असं फडणवीस म्हणाले. निवडणूक काळातील आघाडीविषयी फडणवीसांनी यावेळी सविस्तर भूमिका मांडली.

नक्की वाचा >> युपीमधील गंगेतील मृतदेहांची आपल्याकडे चर्चा झाली पण बीडमधील २२ मृतदेहांच्या विटंबनेची चर्चा झाली नाही : फडणवीस

अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी मान्य केलं. “तो निर्णय चूकच होता. पण त्याचा पश्चात्ताप नाही. कारण ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो, तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. कारण राजकारणात तुम्ही मेलात, तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसला गेल्याला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना, राग होता. त्यातून आम्ही ते केलं. पण ही चूक होती. आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. आमच्या समर्थकांमध्ये जी माझी प्रतिमा होती, त्याला देखील काही प्रमाणात तडा गेला. ते नसतं केलं तर चांगलं झालं असतं”, असं फडणवीस म्हणाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune news sanjay raut slams devendra fadnavis over betrayed comment scsg