पुणे : ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाने आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना २४ तास आरोग्य सेवा देण्याचे नियोजन केले आहे. याअंतर्गत पालखीबरोबर तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार करण्यासाठी फिरती वैद्यकीय पथकेही आहेत.
पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके पालखीबरोबर आहेत. तसेच, ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांवर डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके तैनात आहेत.
पालखी सोहळ्याबरोबर सुसज्ज रुग्णवाहिका आणि फिरते वैद्यकीय पथक आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार करता येणार आहेत. वारीसाठी प्राथमिक उपचारांपासून ते जीवनरक्षक औषधांपर्यंत सर्व प्रकारचा मुबलक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. याचबरोबर गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रमुख ठिकाणी अतिदक्षता विभागाची सोय करण्यात आली आहे. महिला वारकऱ्यांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध असतील आणि मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून वारकऱ्यांना आरोग्य सेवा दिल्या जाणार आहेत. पालखी मार्गावरील स्वच्छता, औषधसाठा आणि वैद्यकीय पथकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. वारकऱ्यांना वारीच्या काळात अखंडितपणे आरोग्य सेवा दिली जाईल. – डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य विभाग.