पुणे : ससून रुग्णालयाजवळ मंगळवार पेठेतील सुमारे दोन एकर मोक्याच्या जागेमुळे भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ही जागा खासगी विकासकाला पोटभाडेकरारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप असून, हा व्यवहार थांबवून तेथे प्रस्तावित कर्करोग रुग्णालय उभारावे, असे पत्र भाजपच्या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवार पेठेतील भूखंड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधकाम व्यावसायिकाला साठ वर्षांच्या कराराने दिला आहे. सुमारे ४०० कोटींचा हा भूखंड ७० कोटींना पोटभाडेकरारावर दिल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर ‘आपले पुणे, आपला परिसर’ संस्थेचे अध्यक्ष, भाजपचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी यांनी ही जागा कर्करोग रुग्णालयाला द्यावी, अशी मागणी केली आहे. ‘कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार असून, तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याचे, वैद्याकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी जाहीर केले होते. ससून रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती इमारत, बी. जे. वैद्याकीय महाविद्यालय, फोटो झिंको, पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा परिषद आदी महत्त्वाची शासकीय आणि निमशासकीय कार्यालये या भूखंडाच्या जवळ आहेत. सद्यास्थितीत पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यात कर्करोग उपचारांसाठी एकही शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे या जागेवर ते उभारण्यासाठी पोटभाडेकरार रद्द करून हा भूखंड कर्करोग रुग्णालयासाठी द्यावा,’ अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

‘कराराचा निर्णय मुंबईत’

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधकाम व्यावसायिकाबरोबर करार केला आहे. मात्र, तो मुंबईतील मुख्य कार्यालयातून झाल्याची माहिती पुण्याच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. जमीन आणि व्यवहार विभागाकडून सदर करार करण्यात आला. पुणे कार्यालयाकडून कोणताही निर्णय झालेला नाही, असा दावा होत आहे.

भुयारी मार्ग किंवा पूल बांधल्यानंतर ससून समोरची जागा चांगल्या प्रकारे जोडली जाईल. त्यामुळे या जागेचा व्यवहार थांबवावा आणि जागा कर्करोग रुग्णालयासाठी द्यावी. – उज्ज्वल केसकर, माजी विरोधी पक्षनेते, भाजप, पुणे महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune plot bjp shiv sena mahayuti controversy pune print news ssb