Pune Rape Case Update Today: पुण्यातील कोंढाव येथील उच्चभ्रु सोसायटीतील सदनिकेत शिरून संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात वेगळीच माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळालेली माहिती पोलिसांनी सांगितली. सदर व्यक्तीने सदनिकेत बळजबरीने प्रवेश केला नव्हता किंवा त्याने पीडितेच्या चेहऱ्यावर कोणताही स्प्रे मारला नसल्याचे समोर आले आहे. तसेच तक्रारदार तरुणीने सेल्फीबाबत जी माहिती दिली, तोही संमतीने काढला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “आम्ही सदनिकेत गेलेल्या व्यक्तीची ओळख पटवली. चौकशीत असे आढळून आले की, तक्रारदार तरुणीच्या घरात आलेला पुरूष डिलिव्हरी एजंट नव्हता. सदर तरूणीला तो एक वर्षापासून ओळखत होता. तसेच तक्रारदार तरुणीच्या घरात त्याने बळजबरीने प्रवेश केला नव्हता. तसेच त्याने स्प्रे मारल्याचाही पुरावा आढळलेला नाही. तसेच त्यांनी घेतलेला सेल्फीही संमतीने काढला होता. सदर व्यक्ती घरातून गेल्यानंतर तक्रारदार महिलेने तो एडिट केला होता.”

दरम्यान तक्रारदार तरुणीने जो बलात्काराचा आरोप केला होता, त्याची चौकशी सुरू आहे, असेही अमितेश कुमार यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी पुणे शहर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, आम्ही संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहोत. संशयिताबद्दलची माहिती लवकरच दिली जाईल. आम्ही संशयिताबद्दलची माहिती पडताळून पाहत आहोत. तक्रारदार तरूणीबरोबर त्याचे पूर्वी काही संबंध होते का? हेही तपासले जात आहे.

तक्रारीत काय म्हटले होते?

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ती घरात एकटी असताना सदर गुन्हा घडला होता. स्वतःला डिलिव्हरी एजंट सांगणाऱ्या एका व्यक्तीने सदनिकेत बळजबरीने प्रवेश केला. त्यानंतर ती बेशूद्ध असताना तिच्याबरोबर सेल्फी घेऊन त्यावर धमकी देणारा मेसेज लिहून ठेवला होता.

पीडितेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी एजंटने बँकेसंबंधी काही कुरिअर आल्याचे सांगितले. पावतीवर स्वाक्षरी हवी असून तो पेन विसरला असल्याचे डिलिव्हरी एजंटने सांगितले. पीडिता घरात पेन आणण्यासाठी गेल्यानंतर संशयिताने फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर पीडितेवर संशियताने बलात्कार केला, असे पीडितेने म्हटले.