पुणे : यंदा गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह पुणे पोलिसांना दिला आहे. गणेशोत्सवानंतर ध्वनिप्रदूषणाचा नियमांच्या पालनाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायाधिकरणाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवाच्या काळात ११ दिवस २०० गणेश मंडळांच्या ठिकाणी आवाजाची पातळी मोजली जाणार आहे.
गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाबाबत डॉ. कल्याणी मांडके यांनी न्यायाधिकरणासमोर याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायाधिकरणाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे पोलिसांना हे निर्देश दिले. गणेश मंडळांच्या ठिकाणी आवाजाची पातळी मोजणे आणि प्रत्येक मंडळासाठी ध्वनिक्षेपकाची मर्यादाही निश्चित करण्यास न्यायाधिकरणाने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणेशोत्सवाच्या ११ दिवसांच्या कालावधीत शहरातील २०० गणेश मंडळांच्या ठिकाणी आवाजाची पातळी मोजण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे न्यायाधिकरणाने म्हटले आहे. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी न्यायाधिकरणासमोर पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. सर्व पोलीस ठाण्यांना गणेश मंडळांच्या ध्वनिक्षेपकांचा आवाज कमी ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत आणि एका मंडळासाठी ध्वनिक्षेपकाची कमाल मर्यादा १०० वॉट करण्यात आली आहे, असेही त्यांनी न्यायाधिकरणाला सांगितले.
गेल्या वर्षी सर्वच मंडळांकडून उल्लंघन
गेल्या वर्षी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने गणेशोत्सवाच्या काळातील ध्वनिप्रदूषणाची पातळी तपासण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांना दिले होते. शहरातील २०० गणेश मंडळांच्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेतल्या होत्या. त्यात सर्वच गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषणाच्या पातळीचे उल्लंघन केल्याचे समोर आले होते. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या ध्वनिप्रदूषण प्रकरणी केलेल्या कारवाईचा तपशील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे पोलिसांनी जाहीर केलेला नव्हता. याबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने मागील सुनावणीवेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे पोलिसांना विचारणा केली होती.
शहरातील ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे
२०२४ – १२४
२०२५ – ६
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार गणेशोत्सवाच्या ११ दिवसांच्या काळात २०० गणेश मंडळांच्या ठिकाणी आवाजाची पातळी मोजण्यात येणार आहे. त्याचबरोबर १५ चौकांमध्ये ४ दिवस २४ तास आवाजाची पातळी मोजण्यात येईल. – बाबासाहेब कुकडे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ