पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी गेल्या तीन वर्षांत लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे स्थानकाच्या पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हडपसर आणि खडकी या नवीन स्थानकांच्या पुनर्बांधणीला गती दिली असून, येत्या वर्षभरात लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकांवरून सोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.
पुणे रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात पुणे रेल्वे स्थानकावरील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या १,५५,०४५ होती. २०२४-२५ मध्ये प्रवासी संख्येत वाढ होऊन ती १,६३,२१२ पर्यंत गेली, तर चालू आर्थिक वर्षात (२६ जूनपर्यंत) प्रवासी संख्येत आणखी भर पडून दररोज सुमारे १,७१,६९६ प्रवासी स्थानकावरून प्रवास करीत आहेत.
‘पुणे रेल्वे स्थानकावरून लांब पल्ल्याच्या ६९ गाड्या, तर विशेष २४ गाड्या धावत आहेत. गेल्या वर्षी ही संख्या अनुक्रमे ६५ आणि ४९ अशी होती. स्थानकावरून धावणाऱ्या नियोजित गाड्यांच्या संख्येतही वाढ झाल्याने प्रवाशांच्या संख्येतही भर पडली आहे. मात्र, गर्दीच्या तुलनेत पुणे स्थानकाची प्रवासी सामावून घेण्याची क्षमता अपुरी ठरत आहे,’ असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी सांगितले.
बेहरा म्हणाले, ‘पुणे रेल्वे स्थानक शहराच्या मध्यवर्ती भागात असून, हे महाराष्ट्रातील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक आहे. मर्यादित जागा आणि वाढती वाहतूक लक्षात घेता स्थानकाचा कारभार सुरळीत राखणे मोठे आव्हान बनले आहे. हडपसर आणि खडकी येथे स्वतंत्र स्थानक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. त्यानुसार हडपसर व खडकी येथील स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही स्थानकांचे काम पूर्ण होताच या स्थानकांवरून गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. जेणेकरून पुणे स्थानकावरील ताण कमी होईल. प्रवाशांचा प्रवास सुकर होईल. येत्या नवीन वर्षापर्यंत दोन्ही स्थानकांचे काम पूर्ण होईल. त्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या हडपसर आणि खडकी स्थानकावरून सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.’
खडकी, हडपसरमधून लांब पल्ल्याच्या गाड्या
हडपसर स्थानक सोलापूर, हैदराबाद आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी उपयुक्त ठरेल, तर खडकी स्थानकावरून मुंबई, उत्तर भारत आणि गुजरातकडे धावणाऱ्या गाड्या सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून डेक्कन क्वीन एक्स्प्रेसने पुणे-मुंबई प्रवास नियमित करतो. सद्य:स्थितीला स्थानकावरील गर्दी खूप चिंताजनक बाब आहे. पूर्वी स्थानकावरून सहज प्रवास करता येत होता. मात्र, वाढत्या गर्दीमुळे रेल्वेत बसेपर्यंत गैरसोय होते. मुख्य स्थानकावरील ताण कमी करणे महत्त्वाचे आहे.- शशांक देशपांडे, प्रवासी
वर्ष…….दैनंदिन सरासरी प्रवासी
२०२३-२४………..१,५५,०४५
२०२४-२५………..१,६३,२१२
२०२५-२६(२६ जूनपर्यंत)…………१,७१,६९६