पुणे जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने काल रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच पुढील तीन तासांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान विभागामार्फत करण्यात आले आहे.
त्याच बरोबर पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणसाठ्यात कमालीची वाढ आहे. त्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सध्याच्या घडीला सुरू असणारा १० हजार ६११ क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवून तो आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास १४ हजार ५४७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून कळविण्यात आले आहे. तर वाढत्या पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन नदी पात्रालगत राहणार्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.