Swargate Rape Case Update: पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात बुधवारी (२६ फेब्रुवारी) पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली. पुण्यात नोकरी करणारी तरुणी फलटन येथे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पहाटे आगारात आली होती. एसटीची वाट पाहत असताना आरोपी दत्तात्रय गाडे हा तिथेच घुटमळत होता. तरुणीला ताई अशी हाक मारत आरोपीने तिचा विश्वास संपादन करत संवाद सुरू केला. ती कुठे जात आहे, याची माहिती घेऊन तिला फलटणला जात असलेली बस दुसरीकडे उभी असल्याचे सांगून शिवशाही बसमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पुणे डिसीपी झोन २ च्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना स्मार्तना पाटील म्हणाल्या की, आरोपी गाडेने ताई तू कुठे चालली? असा प्रश्न विचारून आधी तिची माहिती काढली. त्यानंतर तिने फलटनचे नाव घेतल्यानंतर तिला बस दुसरीकडे लागत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला बसमध्ये बसवतो, असे सांगून तिला बसमध्ये नेले. हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. बसमध्ये अंधार असल्याचे पीडितेने सांगितले होते. मात्र तू मोबाइलचा टॉर्च सुरू करून आतमध्ये प्रवाशी आहेत का? हे बघ असे आरोपीने सांगितले. पीडित तरुणी बसमध्ये चढताच आरोपी मागून गेला आणि दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर त्याने पीडितेवर अत्याचार केला.

स्वारगेट बलात्कार प्रकरणात आतापर्यंत काय घडले?

  • अत्याचार केल्यानंतर आरोपी तिथून निघून गेला. त्यानंतर पीडितेने दुसरी बस पकडून फलटनच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. मात्र तिने यादरम्यान आपल्या मित्राला फोन करून सदर घटनाक्रम सांगितला. मित्राने दिलेल्या सल्ल्यानुसार पीडित तरुणी हडपसरला बसमधून उतरली आणि तिने पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार कथन केला.
  • या घटनेची माहिती बाहेर आल्यानंतर माध्यमे आणि स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी स्वारगेट आगारात धडक दिली. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेटमधील सुरक्षा रक्षकाच्या कार्यालयाची तोडफोड केली.
  • पोलिसांनी घटनेचा तपास करत असातना सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे असल्याचे सांगितले. गाडे सराईत गुन्हेगार असून तो सध्या जामिनावर बाहेर होता. याआधीही त्याच्यावर महिलांना लुटण्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत.
  • स्वारगेटच्या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे. विरोधकांनी पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
  • या घटनेनंतर स्वारगेट आगरातील २३ सुरक्षा कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता नवे सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत, अशी घोषणा राज्य सरकारने केली.
  • गुरुवारीही या घटनेचे पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी १३ पथके रवाना केली आहेत. गाडेच्या कुटुंबियांची आणि मित्र-मैत्रिणींची चौकशी सुरू आहे.
  • पुणे पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकप्रमुख व आगार व्यवस्थापकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशी करण्याचे तसेच दोषी आढळल्यास तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव यांना दिले.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rape case update accused dattatray gade first befriend to victim then raped her swargate bus stand rape case update know latest news kvg