पुण्यातील रस्त्यावरील खड्डे काय करू शकतात? सत्ता उलथवून टाकू शकतात. कसे; ते पुण्यातल्या काँग्रेसशिवाय आणखी कोणाला ज्ञात असेल! कारण, पुण्यावर एके काळी एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेसला पुण्यातील खड्ड्यांनी सत्तेवरून पायउतार केले ते आजतागायत. विद्यमान काळात भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने खड्ड्यांबाबत महापालिका प्रशासनाला जाब विचारण्याचे कष्ट घेतले नाहीत. मात्र, दस्तुरखुद्ध मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेतली. त्यांनी थेट महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे तक्रार करून खड्डे तातडीने बुजविण्याचा आदेश दिला. त्यामुळे पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे हा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
महापालिका निवडणूक आणि खड्डे यांचा जवळचा संबंध आहे. रस्त्यांवर खड्डे पडणे म्हणजे राजकारणात स्वत:च्या हाताने खड्डा खोदण्यासारखे आहे, हा कटू अनुभव काँग्रेसने घेतला. महापालिकेवर एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेससाठी २००७ हे वर्ष कायमचे साडेसातीचे ठरले. तेव्हा पुण्यात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. माजी खासदार सुरेश कलमाडी हे शहराचे सर्वेसर्वा होते. त्या निवडणुकीत काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी करून निवडणूक लढविली. मात्र, अपेक्षित यश मिळाले नाही. तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेसला पुण्यात डोके वर काढता आलेले नाही.
काँग्रेसला पुणेकरांनी नाकारल्यानंतर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने पाय घट्ट रोवण्यास सुरुवात केली. २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला अवघ्या २८ जागा मिळाल्या. त्यानंतरच्या २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपतच झाले. भाजप सत्तेवर आला. काँग्रेसला नगरसेवकांची दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. काँग्रेसचे अवघे नऊ नगरसेवक निवडून आले. रस्त्यांवरील खड्ड्यांवरून पुणेकरांनी दिलेल्या तडाख्यातून काँग्रेस अजून पुरती सावरलेली नाही. त्याची री सत्ताधारी भाजप ओढत असल्यासारखी सद्य:स्थिती आहे. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र, भाजप खड्डे बुजविण्यासाठी आक्रमकपणे भूमिका घेताना दिसत नाही.
महापालिकेत प्रशासकीय राज असल्याने खड्ड्यांचे खापर प्रशासनावर फोडून भाजप नामानिराळे होऊ शकते. मात्र, पुणेकर हे खड्डे कधीही न विसरणारे आहेत, हे भाजपने यापूर्वी पाहिले आहे. महापालिकेत प्रशासनाचा कारभार असला, तरी राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीतील भाजप हा प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांना प्रशासनापेक्षा पुणेकर भाजपलाच दोषी धरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खड्ड्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटका बसला. त्यामुळे त्यांनी थेट महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे तक्रार करून खड्डे ताबडतोब बुजविण्याचा आदेश दिला.
या आदेशानंतर पथ विभाग जागा झाला आणि त्यांनी रस्त्यांबाबत आपण किती कार्यतत्पर आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रस्त्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. राष्ट्रीय पातळीवरील ‘पुणे ग्रँड चॅलेंज २०२६’ ही सायकल स्पर्धा पुण्यात जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे. शहर आणि जिल्ह्यातून या स्पर्धेचा मार्ग जात असल्याने शहरातील ५५ किलोमीटर, तर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील २० किलोमीटर अशा एकूण ७५ किलोमीटर मार्गाचे सुशोभीकरण करण्याचे जाहीर केले. त्यासाठी १४५ कोटी ७६ लाख रुपये खर्च करून या मार्गावरील २०० गतिरोधक, ४०० चेंबरची दुरुस्ती होणार आहे. या निमित्ताने पुणेकरांना चांगला रस्ता मिळेल, असा अंदाज बांधायला हरकत नाही. मात्र, त्याच वेळी रस्त्यांबाबत महापालिका प्रशासनाने केलेला कारभार दुर्लक्षित करण्यासारखा नाही.
२०२३ मध्ये सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करून महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील खड्डे बुजवून रस्ते तयार केले होते. मात्र, १०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा दोषदायित्व कालावधी महापालिकेनेच रस्तेखोदाईला मंजुरी दिल्यामुळे संपुष्टात आला. त्यामुळे या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी ठेकेदाराकडून आता महापालिकेवर आली आहे. या रस्त्यांसाठी पाच वर्षे दोषदायित्व कालावधी होता. मात्र, रस्त्यांवर पालिकेच्या पाणीपुरवठा, ड्रेनेज विभागांसह राज्य सरकारच्या विभागांनी खोदाई केली. त्यामुळे खड्डे बुजविणाऱ्या महापालिकेनेच खड्डे खोदले आणि पुणेकरांचा कररूपी पैसा खड्ड्यांत घातला, हे उघड झाले आहे.
रस्त्यांसाठी ३०० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या रस्त्यांवर दोषदायित्व कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच खोदकाम करण्यासाठी परवानगी देण्याची खरोखरच गरज होती का, अशी परवानगी देणारे अधिकारी कोण, त्याची चौकशी करण्यात आली का, रस्ते चकाचक करण्याचा नवीन प्रस्ताव आणला जात असताना यापूर्वीच्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला जबाबदार कोण, त्याचे दायित्व सत्ताधारी घेणार, की प्रशासनाकडे बोट दाखविणार, असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सत्ताधाऱ्यांची काय अवस्था होते, हे काँग्रेसला पुणेकरांनी दाखवून दिले आहे. भाजपला त्याचे स्मरण असेलच.
sujit.tambade@expressindia.com