पुणे : काळ्या पैशांच्या व्यवहारात पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६२ वर्षीय ज्येष्ठ महिला शनिवार पेठेतील हसबनीस बखळ भागातील एका सोसायटीत राहायला आहेत.
सायबर चोरट्यांनी गेल्या महिन्यात २८ ऑगस्ट रोजी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ‘मुंबईतील कोलाबा पोलीस ठाण्यातील अधिकारी बोलत आहे. काळ्या पैशांच्या व्यवहारात कारवाई करण्यात येणार असून, कारवाई टाळण्यासाठी त्वरीत ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवा’, अशी भीती सायबर चोरट्यंनी त्यांना दाखविली. त्यानंतर चोरट्यांनी कारवाईची भीती दाखवून त्यांच्याकडून महिनाभरात दहा लाख रुपये घेतले. चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर पुन्हा चोरट्यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले. चोरट्यांच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावे भीती दाखवून फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. ईडी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, तसेच सीबीआयकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून चोरट्यांनी तक्रारदारांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ७१ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची ७१ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी विमानतळ आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिंहगड रस्ता भागातील एका नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ४० लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने विमाननगर भागातील एकाची ३० लाख २२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस ष्या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव तपास करत आहेत. शेअर बाजार, घराून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.