पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालयाला जोडणारा भुयारी मार्ग गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. हा भुयारी मार्ग त्वरित सुरू करावा, अशी मागणी वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनकडून करण्यात आली आहे. याबाबत बार असोसिएशनकडून महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड, सचिव ॲड. पृथ्वीराज थोरात, महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. निलेश निकम उपस्थित होते. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील भुयारी मार्ग लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन नवल किशोर राम यांनी शिष्टमंडळास दिले.

महापालिकेच्या २०१०-११ च्या अंदाजपत्रकात या भुयारी मार्गासाठी तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. निलेश निकम यांनी दीड कोटी रुपयांची तरतुद केली होती. शिवाजीनगर न्यायालया आणि कौटुंबिक न्यायालयाला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे २०१८ मध्ये उद्घाटन झाले. काही वर्षे हा मार्ग सुरू होता. भुयारी मार्गाचा वापर वकिलांसह पक्षकारही करत होते.

मेट्रोच्या कामामुळे २०२१ पासून भुयारी मार्ग बंद करण्यात आला. शिवाजीनगर न्यायालयातील प्रवेशद्वार क्रमांक चारजवळून वकील, पक्षकारांना वळसा घालून कौटुंबिक न्यायालयात जावे लागते, असे ॲड. हेमंत झंजाड यांनी सांगितले.