पुणे : शहरात नवरात्रोत्सवाची धामधुम सुरू असतानाच चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील दहा लाख रूपयांचा सुवर्णहार चोरून नेल्याची घटना घडली. कात्रजमधील सुखसागरनगर भागातील एका बंगल्यात ही घटना घडली. याप्रकरणी चोरट्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे सुखसागरनगर भागातील एका बंगल्यात राहायला आहेत. नवरात्रोत्सवात घरातील देवीच्या मूर्तीस सोन्याचा राणीहार परिधान करण्यात आला होता. २४ सप्टेंबर रोजी दुपारी चोरटे त्यांच्या बंगल्यात शिरले. चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील दहा लाख रूपये किंमतीचा सोन्याचा राणीहार लांबविला. तक्रारदार हे पूजा करण्यासाठी देवघरात गेले. तेव्हा राणीहार चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

भरदिवसा बंगल्यात शिरून देवघरातील मूर्तीवरील दहा लाखांचा सुवर्णहार चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.