पुणे : उन्हाळी हंगाम आणि सुट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे ते दानापूरदरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे विभागाकडून पुणे ते दानापूर ही अतिरिक्त रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी पुणे स्थानकावरून (क्र. ०१४१७) ही गाडी रवाना होईल. तिसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी ती दानापूर येथे पोहचेल.
दानापूर रेल्वे स्थानकावरून शुक्रवारी आणि मंगळवारी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी (०१४१८) ही गाडी निघेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी ती पुणे स्थानक येथे पोहोचेल.
दौंड काॅर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छोकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा असा गाडीचा मार्ग असेल, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाकडून देण्यात आली. प्रवाशांना विशेष शुल्कासह रेल्वेच्या संकेतस्थळावर आजपासून (२६ मे) आरक्षण करता येईल. प्रवाशांनी सुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम पाळावेत, असे आवाहन पुणे रेल्वे विभागाकडून करण्यात आले.