पुणे : राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आणि ‘डेक्कन क्वीन’ या गाड्यांसह उत्तरेकडे जाणाऱ्या आणि मुंबईतून पुणेमार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना बसला. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून, प्रवाशांना स्थानकावर प्रतीक्षा करावी लागली.
गेल्या आठवडाभरापासून पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई रेल्वे मार्गांवरून धावणाऱ्या गाड्यांना पावसाचा फटका बसला आहे. सोमवारी मुंबई येथील काही स्थानकांवर पाणी साठल्याने अनेक रेल्वे विलंबाने धावत आहे. विशेषत: उत्तरेकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या आणि पुणे स्थानकावरून उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे उशिरा धावत असून, नियोजित ठिकाणी पोहोचण्यास दोन ते तीन तासांचा विलंब होत आहे. अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमांवर याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
प्रवाशांसाठी अतिरिक्त सुविधा
हैदराबाद आणि कोणार्क एक्स्प्रेस या दीड ते पावणेदोन तासांनंतर पुणे स्थानकावर आल्या. तर, पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तरेकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे नियोजित वेळेत मार्गस्थ झाल्या, तरी अनेक ठिकाणी रेल्वे मार्गांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक मंदावली. त्यामुळे इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून प्रवाशांना स्थानकातच ताटकळत बसावे लागले. उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची आणि गाड्यांची संख्या जास्त असल्याने पुणे रेल्वे व्यवस्थापन विभागाकडून स्थानकाव्यतिरिक्त मंडप टाकून सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावरून उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे नियोजित वेळापत्रकानुसार मार्गस्थ झाल्या. मात्र, पुढे पावसामुळे व्यत्यय आल्याने काही ठिकाणी विलंब झाला आहे, तर मुंबईकडून पुणेमार्गे जाणाऱ्या सहा ते सात रेल्वे उशिरा स्थानकावर पोहोचल्या. इतर गाड्या नियोजित वेळापत्रकानुसार धावत आहेत.- हेमंतकुमार बेहरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग
दररोज सकाळी ७.१५ वाजता पुणे स्थानकावरून धावणारी डेक्कन क्वीन (१२१२४) ही गाडी नियोजित वेळापत्रकानुसार स्थानकावरून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. मात्र, पावसामुळे लोणावळ्यात २२ मिनिटे उशिराने पोहोचली. कल्याण, कुर्ला परिसरात रेल्वे मार्गावर आणि काही स्थानकांवर पाणी साचल्याने रेल्वे पाऊण तास थांबविण्यात आली. मुंबई स्थानकावर दोन तास ३४ मिनिटे उशिरा पोहोचली.- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना