पुणे : पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नीसह तिच्या आईविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या केलेल्या तरुणाचे वय २६ वर्ष असून, तो येरवडा परिसरातील गणेशनगर भागात राहायला आहे. याबाबत त्याच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पत्नी, तसेच तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा आरोपी तरुणीशी सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. तरुणी मूळची बीड जिल्ह्यातील गेवराई येथील आहे. विवाहानंतर तरुणी आणि तिच्या आईने तरुणाला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास सांगितले. वेगळे राहण्यासाठी त्याच्यावर दबाब आणला. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाने १९ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे मुलगा अक्षयने आत्महत्या केल्याचे त्याच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत. पत्नी आणि नातेवाईकांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. आठवड्यापूर्वी सिंहगड रस्ता भागातील एका विवाहित तरुणाने महिलेच्या त्रासामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. महिलेने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून वेळाेवेळी पैसे उकळले होते. महिला, तसेच तिच्या साथीदारांच्या त्रासामुळे तरुणाने आत्महत्या केली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.