पुणे : पुण्यातील तरुणांना रोजच्या जगण्यात अनेक मानसिक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून तरुणांमध्ये अनेक मानसिक समस्या निर्माण होत आहेत. त्यात तणाव, नैराश्य आणि मोबाइलचा अतिवापर यांसारख्या समस्या प्रामुख्याने आढळून येत आहेत, असा निष्कर्ष ‘एम्पॉवर’च्या अहवालातून समोर आला आहे.

आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने मानसिक समस्यांवरील समुपदेशनासाठी केंद्र व हेल्पलाइन चालविण्यात येते. या माध्यमातून १८ ते २५ वयोगटातील तरुणांना भेडसावणाऱ्या मानसिक समस्यांबाबत समुपदेशन केले जाते. याचबरोबर तरुणांना मानसिक आधार देण्याचे काम केले जाते. ‘एम्पॉवर’च्या माध्यमातून २०२२ ते २०२५ या पाच वर्षांच्या काळात देशभरात ५ लाख २७ हजार तरुणांचे समुपदेशन करण्यात आले आहे. यात अभ्यासाचा ताण, करिअरबाबतच्या अपेक्षा आणि सामाजिक आव्हाने यावर प्रामुख्याने समुपदेशन करण्यात आले. याचा अहवाल ‘एम्पॉवर’ने आज (शुक्रवारी) असलेल्या जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जाहीर केला आहे.

या अहवालानुसार, ‘एम्पॉवर’ने गेल्या पाच वर्षांत पुण्यातील २ लाख ६७ हजार तरुणांचे समुपदेशन केले आहे. त्यात १ लाख १३ हजार तरुण आणि १ लाख ४६ हजार तरुणी आहेत. पुण्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या विद्यार्थी आणि नोकरदारांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. पुण्यातील तरुणांमध्ये अनेक मानसिक समस्या आढळून आल्या आहेत. त्यात स्वमग्नता, अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकार, तणाव, नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर आणि मोबाइलचा अतिवापर यांचा समावेश आहे. पुण्याचा विचार करता तरुणी अधिक सक्रियपणे मानसिक समस्यांसाठी मदत मागतात. त्याच वेळी तरुण मात्र मानसिक समस्यांसाठी मदत मागताना संकोच बाळगतात, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर शहरांपेक्षा पुण्यात जागरूकता

मानसिक समस्या असल्यास मदत मागण्यात पुण्यातील तरुण जागरूक आहेत. मानसिक समस्यांबाबत मदत मागण्यात मुंबई, बंगळुरू, कोटा आणि दिल्लीच्या तुलनेत पुण्यातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात मानसिक विकारांबाबत खुली चर्चा होत असल्याचेही निरीक्षण अहवालात मांडण्यात आले आहे.

भारतीय तरुणांमध्ये मोठी क्षमता असली, तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हानेही आहेत. या आव्हानांबाबत खुलेपणाने चर्चा करणे ही समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. पुढील पिढी मानसिकदृष्ट्या निरोगी आणि भावनिकदृष्ट्या संतुलित करण्यासाठी शाळा पातळीवरूनच प्रयत्न करावे लागतील. यामुळे आम्ही शैक्षणिक संस्थांसोबत भागीदारी करीत आहोत. – नीरजा बिर्ला, संस्थापक व अध्यक्षा, एम्पॉवर