पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमतिपत्रे देण्याची मुदत गुरुवारी (२५ सप्टेंबर) संपुष्टात आली. यापूर्वी संमतिपत्रे देण्यासाठी आठवडाभराची मुदत देण्यात आल्याने पुन्हा मुदतवाढ न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (२६ सप्टेंबर) जमिनीच्या मोजणी प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
पुरंदर विमानतळासाठी पारगाव, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी अशा सात गावांमधून जमीन संपादित होणार आहे. विमानतळाला होणाऱ्या विरोधामुळे राज्य सरकारने साडेसातऐवजी तीन हजार एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेतला होता. त्यानुसार सहमती संमतिपत्रे देण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत २ हजार ८०० शेतकऱ्यांनी सुमारे २ हजार ७०० एकर जमीन देण्याची संमती दिली. त्यानंतर संमतिपत्रे देण्यासाठी गुरुवारपर्यंत (२५ सप्टेंबर) मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत ३ हजार २२० शेतकऱ्यांनी २ हजार ८१० एकर जागेचे संपादन करण्यासंदर्भातील संमतिपत्रे सादर केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जमीन घेण्याचे नियोजन आहे. मोजणीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दरनिवाडा निश्चित करून शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला आणि परताव्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर थेट भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यातील सातही गावांंमध्ये सरकारच्या मालकीची सुमारे २०० एकर जमीन उपलब्ध आहे.
विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमतिपत्रे देण्याची मुदत संपुष्टात आली आहे. त्यानुसार २ हजार ८१० एकर जागा लवकरच ताब्यात येणार आहे. संमतिपत्रे देण्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही. शुक्रवारपासून जमिनीच्या मोजणीला प्रारंभ होईल. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी