पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची अधिसूचना काढण्यात आल्यानंतर हरकती आणि सूचना घेण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत आलेल्या २३०७ हरकतींपैकी १८९५ शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध दर्शविला असल्याचा दावा पुरंदर विमानतळविरोधी समितीने पत्रकार परिषदेत केला.
पारगावच्या सरपंच ज्योती मेमाणे, खानवडीच्या सरपंच स्वप्नाली होले, एखतपूर-मुंजवडीच्या सरपंच शीतल टिळेकर, कुंभारवळण गावच्या सरपंच राजश्री कुंभारकर, उदाचीवाडी गावच्या सरपंच आशा हगवणे आणि कुंभारवळणच्या सरंपच मंजूषा गायकवाड आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
‘बाधित सातही गावांतील ग्रामस्थांच्या हरकती आणि सूचनांची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत विरोधाचे प्रमाण ९५.३० टक्के आहे. सहमती दर्शविण्याचे प्रमाण अवघे ४.७० टक्के आहे. सहमती दर्शविणारे ९३ जण हे शेतकरी नसून गुंतवणूकदार आहेत. सात गावांत सुमारे ३०० घरे असून, उर्वरित ९० टक्के शेतकरी हे वाड्या, वस्त्या आणि शेताच्या ठिकाणी राहत आहेत. विमानतळामुळे गावे, वाड्या, वस्त्या, बागायती शेती नष्ट होणार आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना प्रशासकीय अधिकारी आणि राज्यकर्ते दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहेत,’ असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला.
‘दहा टक्के परतावा आणि पुनर्वसन या गोष्टी शेतकऱ्यांच्या हिताच्या नसून, २,२७९ कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. पारगावमध्ये सर्वाधिक चार हजार २२० एकर बागायती आणि ४७० जिरायती एकर क्षेत्र बाधित होत आहे. उपसा सिंचन योजनेमुळे संपूर्ण भाग बारमाही बागायती झाला आहे. शेती हे आमचे उपजीविकेचे एकमेव साधन असून, जमिनींचे संपादन होऊ देणार नाही, या निर्णयावर आम्ही ठाम आहोत,’ असे पारगावच्या सरपंच ज्योती मेमाणे म्हणाल्या.
‘पुरंदर तालुक्यात एका वर्षात तीन पिके घेतली जातात. त्यामध्ये सीताफळ, अंजीर, ऊस, डाळिंब, पेरू आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा सधन भाग आहे. प्रकल्पासाठी शेतजमिनी दिल्यावर पुढच्या पिढीला शेती पाहायलाही मिळणार नाही. विमानतळासाठी जमीन देण्यास विरोध कायम आहे,’ असे कुंभारवळणच्या सरपंच मंजूषा गायकवाड यांनी सांगितले.