हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात हिंदीचा जास्तीतजास्त वापर करावा, असा आग्रह रेल्वेने धरला आहे. रेल्वेच्या पुणे विभागाने याबाबत केलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांनी नुकताच घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : दुहेरीकरणामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द ; काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल 

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील राजभाषा कार्यान्वयन समितीची बैठक विभागीय कार्यालयात झाली. ही बैठक विभागीय व्यवस्थापिका इंदू दुबे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला सातारा, मिरज, कोल्हापूर, पुणे या स्थानकांवरील सर्व शाखा अधिकारी आणि स्थानक राजभाषा कार्यान्वयन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दुबे यांनी हिंदीच्या प्रचार आणि प्रसारासाठी रेल्वेकडून सुरू असलेल्या कार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. दैनंदिन वापरात रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहजसोप्या हिंदीचा वापर करावा. हिंदीमध्ये काम करणे हे आपले कर्तव्य आहे, असे दुबे यावेळी म्हणाल्या. अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक ब्रजेशकुमार सिंह यांनीही कार्यालयीन कामकाजात हिंदीचा वापर वाढवण्यावर भर देण्याची गरज अधोरेखित केली. या बैठकीत उपस्थित सदस्यांनी हिंदी पुस्तक दालनांची स्थिती सुधारण्याची मागणी केली. या बैठकीचे सूत्रसंचालन सचिव व राजभाषा अधिकारी डॉ.शंकरसिंह परिहार यांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railways taken initiative to promote hindi language in day to day operations pune print news stj 05 zws