पुणे : सध्याच्या राजकारणामध्ये निष्ठा आणि विचारांना अर्थ राहिलेला नाही. गुंडगिरी आणि भ्रष्टाचार वाढीला लागला आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. राजकारणापासून दूर राहणाऱ्या तरुणांनी देशात लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात यावे, सुशिक्षित तरुण राजकारणात आला तर देशाला समर्थ नेतृत्व मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित सातव्या युवा संसदेच्या उद्घाटनावेळी राजू शेट्टी बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात संजय जाधव, ओमराजे निंबाळकर यांना आदर्श खासदार पुरस्कार, माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, सरपंच दिलीप घोलप यांना आदर्श सरपंच पुरस्कार, तर उद्योजक सनी निम्हण यांना आदर्श युवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – पुणे : गृहिणींसाठी खुशखबर; पालेभाज्या स्वस्त

राजू शेट्टी म्हणाले, तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी आपण राजकारणात कशासाठी येणार आहोत, हे उद्दिष्ट निश्चित करावे. राजकारण म्हणजे केवळ पैसा प्रसिद्धी सत्ता मिळवण्याचे साधन नाही तर ते समाजाची सेवा करण्याची एक संधी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. राजकारण जर सकारात्मकतेने केले तर जनता निश्चितच आपल्या पाठीशी उभी राहते हे मी वैयक्तिक अनुभवातून आपल्याला सांगतो. राजकारणामध्ये अनेक समस्या असल्या तरी या देशाला हुकूमशाहीपेक्षा लोकशाहीच पुढे नेऊ शकते. त्यामुळे या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी तरुणांनी राजकारणात आले पाहिजे.

राजकारणामध्ये निष्ठा कायम ठेवली तर यश निश्चितच मिळते. राजकीय सुडापोटी माझ्या वडिलांचा खून झाल्यानंतर मी लोकांच्या प्रेमापोटी राजकारणामध्ये आलो आणि आज तळागाळातील लोकांपर्यंत माझे काम पोहोचल्यामुळे त्यांना मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटतो, हे माझ्या राजकारणाचे यश आहे. केवळ लोकांना दाखवण्यासाठी म्हणून काम करू नका. समाजाविषयी तळमळ तुमच्या कामातून दिसली तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात, अशी भूमिका ओमराजे निंबाळकर यांनी मांडली.

हेही वाचा – पुणे : कोयत्याच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले

भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि निष्ठाहीन लोकांनी भरलेल्या आजच्या राजकारणामध्ये जर तरुणांना यावेसे वाटले तर त्यांनी कोणाकडे पहावे? असा प्रश्न आहे. परंतु राजकारण वाईट आहे असे समजून त्यापासून दूर राहू नका. तर ते वाईट राजकारण चांगले करण्यासाठी सकारात्मक विचारांचे सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये आले पाहिजे. जर सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये आले नाहीत तर या देशावर एक दिवस निश्चितच हुकूमशाही येईल, असे संजय जाधव यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty reaction on political situation he said corruption have increased pune print news ccp 14 ssb