पुणे महापालिकेच्या अखत्यारीतील नाट्यगृहांच्या तारखांच्या आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘रंगयात्रा ॲप’मधील तांत्रिक दोष समोर आल्यानंतर सध्या ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींनी अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र, ‘रंगयात्रा ॲप’ नकोच, असे म्हणताना पारदर्शकतेला विरोध होत आहे, की सुसूत्रतेचा आग्रह धरला जात आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महापालिकेच्या अखत्यारीतील नाट्यगृहांच्या तारखांच्या आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘रंगयात्रा ॲप’मधील तांत्रिक दोष समोर आल्याने या ‘ॲप’ची अंमलबजावणी करण्यास नाट्यनिर्माते आणि व्यवस्थापकांनी विरोध दर्शविला आहे. या संदर्भात केवळ घंटानाद आंदोलन करून हा विषय थांबला नाही, तर महापालिकेने ‘ॲप’ची अंमलबजावणी स्थगित करावी या मागणीसाठी थेट उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, तसेच खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना साकडे घालण्यात आले. ‘माझ्या उपस्थितीत नाट्यनिर्मात्यांची बैठक होईपर्यंत नाट्यगृहांच्या तारखांचे ऑनलाइन आरक्षण करण्यात येऊ नये,’ असे निर्देश अजित पवार यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना दिल्यानंतर तूर्त हा विषय थांबला आहे. मात्र, रंगयात्रा ॲप नकोच, असे म्हणताना पारदर्शकतेला विरोध होत आहे, की सुसूत्रतेचा आग्रह धरला जात आहे, हा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला आहे.

पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर महापालिका प्रशासनाने नाट्यगृहांच्या तारखावाटपासंदर्भात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जानेवारीपासूनच्या चौमाही वाटपासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ‘आलेल्या अर्जांचा विचार करून सर्वांचे समाधान होईल, अशा पद्धतीने तारखांचे वाटप करण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रेक्षागृह आणि विठ्ठलराव तुपे नाट्यगृह येथील तारखांचे वाटप करताना शनिवार आणि रविवार या दोन दिवशी नाटकांना प्राधान्य देण्यात येणार आहे,’ अशी माहिती महापालिका नाट्यगृहांचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे यांनी दिली.

पुणे महापालिकेने सांस्कृतिक केंद्रांच्या तारखांच्या ऑनलाइन आरक्षणासंदर्भात ‘रंगयात्रा ॲप’ विकसित करून त्याची गेल्या आठ महिन्यांपासून अंंमलबजावणी सुरू केली. यामध्ये कोणालाही एक कळ दाबून महापालिका नाट्यगृहांचे आरक्षण करणे शक्य झाल्याने त्यामध्ये पारदर्शकता आली, असा दावा महापालिका प्रशासनाने केला. मात्र, ‘ॲप’च्या अंमलबजावणीत काही तांत्रिक अडचणी आल्या असून, कलाकारांकडून विरोधही दर्शविला गेला आहे. यामध्ये प्रामुख्याने नाटकांच्या तारखा कमी झाल्याची तक्रार नाट्यनिर्मात्यांकडून करण्यात आली होती. ‘ॲप’मुळे नाट्यगृहांचे आरक्षण करणे कठीण झाले असल्याचीही तक्रार करण्यात आली होती.

रंगयात्रा ॲपच्या आधारे दोन चौमाही तारखांचे वाटप झाल्यानंतर यातील तांत्रिक त्रुटी निदर्शनास आल्या. कोणालाही नाट्यगृहांच्या तारखांचे आरक्षण करता येणे शक्य झाल्याने नाटकांना मिळणाऱ्या तारखांमध्ये कपात झाल्याचा नाट्यनिर्मात्यांचा आक्षेप होता. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासन ॲपच्या अंमलबजावणीसाठी आग्रही राहिले. त्याच वेळी पूर्वी आरक्षित केलेल्या नाट्यगृहांतील कार्यक्रम रद्द झाल्यामुळे नाट्यगृह रिकामे ठेवण्याची वेळही आली हाेती.

‘संस्थांना पूर्वीच्या प्रमाणात तारखा दिल्या जात असल्याचा दावा असला, तरी नाट्यगृहांचे आरक्षण सर्वांना खुले झाल्यामुळे नाटकांच्या तारखा प्रत्यक्षात कमी झाल्या. कलाकारांच्या तारखांवर अवलंबून असलेल्या या व्यवसायामध्ये एखाद्या नाट्यसंस्थेला प्रयोग रद्द करावा लागला, तर ती तारीख दुसऱ्या नाट्यसंस्थेला मिळत होती. तारखांची आपापसांमध्ये देवाणघेवाण करण्याची ही सोय ऑनलाइन आरक्षणामुळे बंद झाली. त्याचप्रमाणे खासगी संस्थेचा कार्यक्रम रद्द झाला, तर नाट्यगृह मोकळे राहत असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब ध्यानात घेऊन ऑनलाइन आरक्षणाच्या अंमलबजावणीला नाट्यनिर्मात्यांचा विरोध आहे,’ याकडे संवाद, पुणे संस्थेचे सुनील महाजन यांनी लक्ष वेधले. या संदर्भात महापालिकेने सांस्कृतिक धोरण आखून नाट्यगृहांच्या तारीखवाटपासंदर्भात नियमावली करावी आणि त्याची काटेकोर अंंमलबजावणी करावी,’ अशी मागणी त्यांनी केली.
vidyadhar.kulkarni@expressindia.com