पुणे : डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पती व पत्नीचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय समितीने चौकशी सुरू केली. ही समिती उद्या (ता.२५) रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन झाडाझडती घेणार आहे. रुग्णांवर केलेले उपचार आणि शस्त्रक्रियेचे अहवाल यांची तपासणी समिती करणार आहे. समिती या महिन्याच्या अखेरपर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सरकारला सादर करणार आहे.
सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर बापू कोमकर यांचा १५ ऑगस्टला मृत्यू झाला होता, तर दाता असलेल्या पत्नी कामिनी कोमकर यांचा २२ ऑगस्टला मृत्यू झाला होता. रुग्णांच्या नातेवाइकांनी याप्रकरणी सह्याद्री रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच, समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत सह्याद्री रुग्णालयातील प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना स्थगिती देण्यात आली आहे. याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागासह महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयाला नोटीस बजावली होती.
उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी इंटरनॅशनल लिव्हर ट्रान्सप्लांट सोसायटी चेन्नईचे अध्यक्ष व यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मोहम्मद रेला असून, सदस्य सचिवपदी आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. भगवान पवार आहेत. या समितीच्या सदस्यांमध्ये डॉ. राम प्रभू, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. विजय व्होरा, डॉ. आकाश शुक्ला, डॉ. पद्मसेन रणबागले यांचा समावेश आहे. या समितीची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे २९ ऑगस्ट झाली होती.
या बैठकीत रुग्णालयाने सादर केलेल्या दोन्ही रुग्णांच्या वैद्यकीय अहवालांवर चर्चा करण्यात आली. याचबरोबर चौकशीची रूपरेषा निश्चित केली होती. या रुग्णांवर झालेले उपचार, त्यांच्यावरील शस्त्रक्रिया याच्याशी निगडित सर्व अहवाल आरोग्य विभागाने सह्याद्री रुग्णालयाकडून घेतले होते. आता समिती उद्या प्रत्यक्ष रुग्णालयाला भेट देऊन चौकशी करणार आहे.
सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पती व पत्नीचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय समितीकडून उद्या सह्याद्री रुग्णालयाला भेट देऊन चौकशी केली जाणार आहे. या चौकशीनंतर या महिन्याच्या अखेरपर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सरकारकडे सादर केला जाईल. – डॉ. भगवान पवार, उपसंचालक, आरोग्यसेवा.