पुणे : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील हे सध्या उपचार घेत आहेत.मात्र सगे सोयऱ्यांच्या नियमांची अंमलबजावणी न झाल्यास उपचार घेणं बंद करेन, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्याच दरम्यान स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हे पुणे दौर्‍यावर होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण बाबत विचारले असता ते म्हणाले की,माझ्या पणजोबांनी पहिले आरक्षण कोल्हापूर संस्थानात दिले होत.त्यावेळी ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानंतर देशभरात ते आरक्षण लागू झाले. गरीब मराठा समाजातील नागरिकांना आरक्षण मिळव, यासाठी मी २००७ आणि २००९ या वर्षी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असल्याच त्यांनी सांगितले.

हेही वाचा…लिपिकाकडून ४५ लाखांचा अपहार… कुठे घडला प्रकार?

तसेच ते पुढे म्हणाले की, गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा,यासाठी मनोज जरांगे हे लढा देत आहेत आणि आजवर त्यांनी भूमिका मांडली आहे.तसेच मनोज जरांगे आणि सरकारचे नवी मुंबईमध्ये काय बोलणं झालं.त्यांना काय शब्द दिला.हे त्या दोघांना माहिती आहे. याबाबत मला काही माहिती नाही.पण आता हा विषय अधिक चिघळण्यापेक्षा मनोज जरांगे आणि सरकारने एकत्र बसावे,जेणेकरून गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा,अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.