भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र विधीमंडळात मंगळवारी (२८ डिसेंबर) विद्यापीठ सुधारणा विधेयकावर चर्चा करताना LGBTIQ (एल.जी.बी.टी.आय.क्यू.) समुदायाच्या सदस्यांना सामावून घेण्यास विरोध केला. तसेच अलैंगिक संबंधावर वादग्रस्त वक्तव्य केलं. यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. LGBTIQ समुहासोबत काम करणाऱ्या ‘सम्यक’ संस्थेने या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सम्यक संस्थेने आपल्या निवेदनात म्हटलं, “सुधीर मुनगंटीवार यांनी एखादी व्यक्ती समलैंगिक आहे किंवा कसे हे सिद्ध कोण करणार, त्यांना प्रमाणित कोण करणार असे तांत्रिक आणि प्रशासकीय प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी केलेली विधाने त्यांच्या कमी आकलनातून किंवा लैंगिक ओळखीबाबतच्या संपूर्ण अज्ञानातून केले हे स्पष्ट दिसते. समलैंगिक स्त्रिया (लेस्बियन्स), समलैंगिक पुरुष (गे) व अलैंगिक व्यक्ती म्हणजे काय याची त्यांना पुरेशी कल्पनाच नाही. त्यामुळे अलैंगिक व्यक्ती म्हणजे जनावरांसोबत लैंगिक संबंध ठेवणारा असे असंवेदनशील वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.”

“कोणीही व्यक्ती मी समलैंगिक आहे किंवा मला समलैंगिक आकर्षण आहे असे लिहून देणार का? हा प्रश्न विचारताना मुनगंटीवार यांना सामाजिक व सांस्कृतिक पातळीवर संघर्ष करून आपली ओळख समोर आणणाऱ्या अनेक समलैंगिक व्यक्तीबद्दल व गटांबद्दल माहिती नाही. या विधानांमधून त्यांनी हेच अप्रत्यक्षपणे कबूल केलं. शिवाय, अलैंगिक व्यक्ती जनावरांसोबत संबंध ठेवते असा त्यांचा मुलभूत गैरसमज असल्याचे दिसते. समलैंगिक व्यक्तींना सदस्यत्व दिल्यास आपण शिक्षण व्यवस्थेची वाट लावणार आहोत का? असा प्रश्न विचारून एका अर्थाने त्यांनी समलैंगिक अभ्यासक, साहित्यिक, कलाकार, कार्यकर्ते, विश्लेषक यांचे ज्ञान क्षेत्रातील योगदानच नाकारले आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असंही सम्यक संस्थेने सांगितलं.

सम्यकचे कार्यकारी संचालक आनंद पवार म्हणाले, “भारताच्या संविधानाने भारताच्या सर्व नागरिकांना भेदभावरहित सहभागाचा आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार मान्य केला आहे. याशिवाय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता गुन्हा नसल्याचा निवडा दिला आहे. संसदीय राजकारणात व प्रशासनात ट्रान्सजेंडर व्यक्तींनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. असं असताना सुधीर मुनंगंटीवार यांनी केलेली विधाने ही संविधानाचा व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान करणारी आहेत.”

“या शिवाय सुधीर मुनगंटीवार हे ज्या विचारधारेचे समर्थक आहेत त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक मोहन भागवत यांनी गे आणि ट्रान्सजेंडर आपल्या समाजातील अविभाज्य व्यक्ती आहेत असं २०१९ मध्ये म्हटलं होतं. मुनगंटीवार भागवत यांच्या या विधानाशी विसंगत भूमिका घेत आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

“जगभरामध्ये एलजीबीटीआयक्यू समुदायाच्या हक्कांबाबत जागृती होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघात या समुदायाचे नागरी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक हक्क मान्य केले आहेत. असं असताना सुधीर मुनगंटीवारांची ही भूमिका वैचारिकदृष्ट्या मागासलेपणाकडे घेऊन जाणारी आणि मानवी हक्कांच्या विरोधात आहे. मुनगंटीवारांनी मांडलेली ही भूमिका ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? याचा खुलासा त्यांनी करावा,” अशी मागणी संस्थेचे विश्वस्त प्रीतम पोतदार यांनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyak ngo anand pawar criticise bjp mla sudhir mungantiwar over lgbtq controversial statement pbs