बारामती : ‘जाऊ देवाचिया गावा, घेऊ तेथेची विसावा! देवा सांगू सुख दुःख, देव निवारील दुःख’ असे म्हणत पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या आसेने निघालेला वैष्णव भक्तांचा मेळा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता कवी मोरोपंतांच्या बारामतीनगरीत विसावला. जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे बारामतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर पालखी सोहळा बारामतीतील शारदा प्रांगणमध्ये समाज आरतीसाठी दाखल झाला. बारामतीतील मुक्काम आटोपून पालखी शुक्रवारी काटेवाडीमार्गे सणसर या ठिकाणी प्रस्थान ठेवणार आहे. काटेवाडीत संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिले मेंढ्यांचे रिंगण होणार आहे. येथे गेल्या ३०० वर्षांपासून सुरू असलेली धोतरांच्या पायघड्यांनी पालखीचे स्वागत करण्याची परंपरा पाहायला मिळणार आहे. सणसर येथे पालखीचा शुक्रवारी मुक्काम असणार आहे.

संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी बारामतीतील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेल्या भाविकांनी हा अनुपम भक्तिसोहळा डोळ्यांत साठवून घेतला. बारामती शहर आणि परिसरातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था, संघटनांनी वारकऱ्यांची सेवा केली. शहरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्रीराम मंदिर, सिद्धेश्वर मंदिरासह सर्व मंदिरांमध्ये वैष्णव विसावले.