पुणे : ससून रुग्णालयात मानसोपचार विभागात उपचार घेत असलेल्या तरुणाने अकरा मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या रुग्णाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला याची माहिती मिळाली. यामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

पोलिसांनी आत्महत्या केलेल्या व्यक्तीची ओळख विजय अशी पटवली आहे. तो २५ वर्षांचा होता. विजयने ५ सप्टेंबरला रेल्वेगाडीसमोर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्यावर रुग्णालयातील मानसोपचार विभागात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्याने अकराव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली.

रुग्णालयातील कर्मचारी सकाळी रुग्णांना औषधे देण्यासाठी गेला. त्या वेळी त्याला रुग्ण दिसला नाही. त्याने वैद्यकीय अधिकाऱ्याला याची माहिती दिली. आजूबाजूला शोधाशोध केली असता, अकरा मजली इमारतीजवळ रुग्णाचा मृतदेह आढळला.

हा रुग्ण ५ सप्टेंबरपासून १० सी या वॉर्डमध्ये दाखल होता. त्याच्यासोबत कोणीही नातेवाईक नव्हते. त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्यावर उपचार सुरू होते. रुग्णाच्या जखमांवर नियमितपणे उपचार सुरू होते. जखमेमुळे त्याला चालण्यात अडचण येत होती. या रुग्णाने उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. हा रुग्ण हिंसक होता आणि तो उपचारात सहकार्य करीत नव्हता. त्यामुळे त्याला मानसोपचार विभागात दाखल करण्यात आले होते. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

रुग्णालयाच्या आवारात रुग्णाने आत्महत्या केल्यानंतरही तातडीने याची माहिती प्रशासनाला नव्हती. कक्षातून रुग्ण बेपत्ता झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केली. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडल्याने रुग्णालय प्रशासन जागे झाले. या घटनेमुळे ससूनमधील रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

दरम्यान आधीही रुग्णालयात रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच वैद्यकीयच्या एका विद्यार्थिनीनेही नुकतीच आत्महत्या केली होती. यामुळे एकूणच ससून रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.